पिंपरी : मुंबई-बंगळुरु बाह्य़वळण महामार्गावर मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कंटेनर उलटा झाला. त्यामुळे बावधन, चांदणी चौक परिसरातील वाहतूक सुमारे तीन तास खोळंबली होती. वाहनांच्या रांगा सहा किलोमीटपर्यंत लागल्याने या भागातील वाहतूक विस्कळीत झाली. अखेर क्रेनच्या साहाय्याने हिंजवडी वाहतूक पोलिसांनी अवजड कंटेनर हलवल्यानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली.

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास मुंबईहून पुण्याकडे चुनखडी वाहतूक करणारा कंटेनर बावधन जवळील घोडावत गोदाम परिसरात उलटला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाहतूक पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, अवजड कंटेनर रस्त्यावर उलटल्याने या भागातील वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या. घटनास्थळावरून कंटेनर रस्त्याच्या बाजूला करण्यासाठी क्रेनची व्यवस्था होईपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहने मार्गस्थ करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले. मात्र, सायंकाळी हिंजवडी तसेच पिंपरी परिसरातून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्याने वाहनांची रांग तीन किलोमीटपर्यंत लागली होती.

दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्यामुळे कंटेनर बाजूला करण्यासाठी क्रेन घटनास्थळी दाखल होईपर्यंत पोलिसांची धावपळ उडाली. सुरुवातीला कंटनेरमधील चुन्याची पोती बाजूला काढण्यात आली. त्यानंतर कंटेनर रस्त्यामधून काढण्यात आला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास क्रेनच्या साहाय्याने कंटेनर बाजूला काढण्यात यश आले. त्यानंतर या भागातील वाहतूक सुरळीत झाली.

वाहनचालकांना मनस्ताप

हिंजवडीतील माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांतून सायंकाळी घरी परतणारे कर्मचारी तसेच पुण्याकडे जाणारे वाहनचालक कोंडीत अडकल्याने त्यांना मनस्ताप सोसावा लागला. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या पण मोठय़ा संख्येने वाहने रस्त्यावर असल्याने वाहनांची रांग तीन किलोमीटपर्यंत जाऊन पोहोचली होती.

बावधन भागात मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास चुनखडीची वाहतूक करणारा कंटेनर उलटला. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कंटेनर क्रेनच्या साहाय्याने बाजूला काढण्यात आला. दरम्यान, विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत होण्यासाठी पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली.

 – सुनील दहिफळे, पोलीस निरीक्षक, हिंजवडी वाहतूक विभाग