गस्त घालणाऱ्या पोलीस शिपायाच्या डोक्यात दारुची बाटली मारल्याची घटना कसबा पेठ भागात शनिवारी (८ऑक्टोबर) रात्री घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एकाला पकडले असून त्याच्या अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.

प्रदीप अरुण राळे असे जखमी झालेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. याप्रक रणी नाझ अख्तर शेख (वय १९,रा. रविवार पेठ) याला अटक करण्यात आली. त्याच्यासोबत असलेल्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. राळेंनी यासंदर्भात फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई राळे शनिवारी रात्री कसबा पेठेतील मुस्लीम दफनभूमी परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी आरोपी नाझ आणि त्याच्यासोबत असलेले अल्पवयीन साथीदार तेथे दारु पित बसले होते.राळेंनी त्यांना हटकले. त्यानंतर शेख आणि त्याचे साथीदार पसार झाले. पोलीस शिपाई राळे आणि त्यांच्यासोबत असलेले सहकारी पाटील यांनी त्यांचा पाठलाग सुरु केला.

त्या वेळी अंधारात राळेंच्या डोक्यात दारुची बाटली मारण्यात आली. राळे आणि पाटील यांनी शेख आणि त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन साथीदारांना पकडले. राळेंना तातडीने रु ग्णालयात दाखल करण्यात आले. प्रथमोपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक कदम तपास करत आहेत.