महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात बुधवारी करोनाचा संसर्ग झालेल्या पाच संशयितांना चाचण्यांसाठी दाखल करण्यात आले होते. यांपैकी, तीन जणांची चाचणी पॉझिटिव्ह तर दोघांची निगेटिव्ह आली आहे. पुण्यातील आठ बाधितांपैकी हे तिघे असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

सध्या पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात करोना बधितांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, बुधवारी पाच संशयीत प्रवाशांना यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या घशातील द्रव्यांचे नमुने पुण्यातील एनआयव्ही येथे पाठविण्यात आले होते. यांपैकी, तीन जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

या तिघांवर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले आहे. सदर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आणि नातेवाईकांचीही माहिती घेऊन त्यांनाही रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात येत असल्याचे आयुक्त म्हणाले. दरम्यान, चाचणी निगेटिव्ह आलेल्या दोघांना घरी सोडण्यात आले आहे.