माहिती अधिकार कार्यकर्ता विनायक शिरसाट खून प्रक रणात गुन्हे शाखेकडून तिघांना अटक करण्यात आली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी आर्थिक वादातून शिरसाट यांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न  झाले आहे.

या प्रकरणी मुख्य सूत्रधार धरमप्रकाश कर्ताराम वर्मा (वय ३८, सध्या रा. रिव्हरव्हयू सोसायटी, शिवणे, मूळ रा. उतरोला, जि. बलरामपूर, उत्तरप्रदेश), मुख्तारअली मसीहुद्दीन अली (वय ३४, सध्या रा. लिपाणे वस्ती, आंबेगाव, मूळ रा.खजराणा, इंदूर, मध्यप्रदेश), महंमद फारुख इसहाक खान (वय २८, सध्या रा. उत्तमनगर, मूळ रा. रनुडी, जि. बलरामपूर, उत्तरप्रदेश) यांना अटक करण्यात आली.

शिरसाट माहिती अधिकार कार्यकर्ता होते तसेच ते बांधकाम व्यावसायिक होते. आरोपी वर्मा ठेकेदार आहे. पैशांवरुन वर्मा याचा शिरसाट यांच्याशी वाद झाला होता. या वादातून वर्मा, साथीदार अली, खान यांनी शिरसाट यांचे अपहरण करुन खून केला. मुळशी तालुक्यातील मुठा गावाजवळ शिरसाट यांचा मृतदेह टाकून आरोपी पसार झाले.

दरम्यान, पसार झालेले आरोपी अली आणि खान तेलंगणातील मेहबुबाबाद परिसरात असल्याची माहिती सहायक फौजदार किशोर शिंदे आणि मेहबुब मोकाशी यांना मिळाली. पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत वर्माने संगनमत करुन शिरसाट यांचा खून करण्यास सांगितल्याची कबुली आरोपींनी दिली. त्यानंतर वर्माला ताब्यात घेण्यात आले.

सहायक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक निकम, संदीप देशमाने, संजय गायकवाड, अजय म्हेत्रे, अनिल शिंदे, दीपक मते आदींनी ही कारवाई केली.