इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीसारख्या (आयआयटी) केंद्रीय अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमधील प्रवेशांसाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या जेईई मुख्य या सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रातून पुण्याच्या राज आर्यन अगरवालसह अंकित कुमार मिश्रा आणि कार्तिकेय चंद्रेश गुप्ता यांनी १०० पर्सेटाइलसह देशातील पहिल्या १५ विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले.

यंदा नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे पहिल्यांदाच परीक्षा घेण्यात आली. ८ ते १२ जानेवारीदरम्यान ही परीक्षा झाली. या परीक्षेसाठी या वर्षी देशभरातून ९ लाख २९ हजार १९८ विद्यार्थ्यांनी  नोंदणी केली होती. त्यातील ८ लाख ७४ हजार ४६९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. देशभरातील आणि परदेशातील मिळून २५८ केंद्रांवर दोन सत्रांमध्ये परीक्षा झाली. या  वर्षी प्रथमच या परीक्षेच्या निकालात पर्सेटाइल पद्धत वापरण्यात आली.

देशभरातील १५ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेटाइल मिळवले. त्यात तेलंगणातील ४, महाराष्ट्रातील ३ आणि उत्तर प्रदेशमधील २, राजस्थानमधील २, तर मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि पंजाबमधील प्रत्येकी एका विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या परीक्षेत पात्र न ठरलेल्या विद्यार्थ्यांना एप्रिलमध्ये पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी मिळेल.

एप्रिलमधील जेईईनंतर अंतिम क्रमवारी जाहीर होणार

एप्रिलमध्ये पुन्हा एकदा जेईई झाल्यानंतर अंतिम क्रमवारी जाहीर केली जाणार आहे. पुन्हा परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना त्यांची कामगिरी अधिक चांगली करण्याची संधी मिळेल. यंदा जेईईमध्ये पर्सेटाइल पद्धतीचा पहिल्यांदाच अवलंब करण्यात आला. जागतिक स्तरावर वापरली जाणारी आणि अधिक शास्त्रशुद्ध अशी ही पद्धत आहे, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट केले.

एनटीएने निकाल जाहीर करताना आरक्षणानुसार पर्सेटाइल जाहीर करायला हवे होते. मात्र, सर्वसाधारण पर्सेटाइल जाहीर करणे हे अनपेक्षित आहे. आरक्षणानुसार निकाल जाहीर न झाल्याने विद्यार्थी निराश होण्याची शक्यता आहे. ती सुधारणा एनटीएने करायला हवी. अन्यथा यातून अनावश्यक वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. १८५-१९५ गुणांसाठी साधारणपणे ९९ पर्सेटाइल आहे. ८४-८५ पर्सेटाइल खुल्या गटातील विद्यार्थ्यांना जेईई अ‍ॅडव्हान्स देण्यासाठी पुरेसे असेल असे वाटते. एनटीएने अपेक्षेपेक्षा खूप आधी निकाल जाहीर केला.

– दुर्गेश मंगेशकर, प्रवेश परीक्षा तज्ज्ञ

महापालिकेच्या शाळेत शिक्षण आणि १०० पर्सेटाइल!

राज आर्यन अगरवालचे यश

पुण्यात हडपसरमध्ये राहणाऱ्या आणि पुणे महापालिकेच्या राजीव गांधी ई लर्निग स्कूलमध्ये शिकलेल्या राज आर्यन अगरवालने १०० पर्सेटाइलसह देशात दुसरा क्रमांक मिळवला. गणित आणि विज्ञानात रस असल्याने आयआयटीला प्रवेश मिळवण्याचे लक्ष्य ठेवून त्याने अभ्यास केला. आता त्याला आयआयटी मुंबईमध्ये संगणक विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याची इच्छा आहे.

मूळचा बिहारमधील दरभंगा येथील असलेला राज आर्यन अगरवाल आणि त्याचे कुटुंबीय चार वर्षांपूर्वी रशियातून पुण्यात स्थायिक झाले. त्याचे वडील पेट्रोकेमिकल अभियंता आणि आई विज्ञानाची पदवीधर आहे. जेईईमध्ये मिळालेल्या यशाचा त्याने आनंद व्यक्त केला. ‘दोन वर्षे अ‍ॅमेनोरा शाळेत शिकल्यानंतर महापालिकेच्या शाळेत प्रवेश घेतल्याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटत होते. मात्र, मला काय करायचे आहे, हे आधीच ठरवलेले होते. त्यामुळे अन्य गोष्टींमध्ये मला वेळ वाया घालवायचा नव्हता. आयआयटीला प्रवेश मिळवण्याचे लक्ष्य समोर ठेवले होते. जेईईच्या तयारीसाठी खासगी शिकवणी लावली होती,’ असे त्याने सांगितले.

‘साधारणपणे दिवसाला मी पाच तास अभ्यास करत होतो. गुण मिळवण्यासाठी मी अभ्यास केला नाही. एखादी गोष्ट अगदी व्यवस्थित कळली, तर ती आपण सहसा विसरत नाही. विषय कळण्यासाठी त्यात मजा वाटली पाहिजे, त्या विषयाचा आनंद घेता आला पाहिजे. त्यामुळे अभ्यास करताना स्वत:लाही वेळ दिला. मला पियानो वाजवायला आवडतो,’ असेही तो म्हणाला.