पिंपरी पालिकेचे अधिकारी व काही बांधकाम व्यावसायिक संगनमताने स्वच्छतागृहे पाडत असल्याची माहिती मंगळवारी स्थायी समितीत उघड झाली. ‘बिल्डर लॉबी’ च्या  फायद्यासाठी नागरिकांची गैरसोय करण्याचा ‘उद्योग’ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिले आहेत.
स्थायी समितीचे अध्यक्ष नवनाथ जगताप यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत अविनाश टेकवडे आणि सुनिता वाघेरे यांनी हा विषय उपस्थित केला. कनिष्ठ अभियंते बांधकाम व्यावसायिकांचे एजंट झाल्याची टीका जगतापांनी केली. मोहननगर येथील तीन स्वच्छतागृहे शौचालये पाडण्यात आल्याचे टेकवडे यांनी निदर्शनास आणून दिले. त्यापैकी एकास पाडण्याची परवानगी पालिकेने दिली होती. मात्र, पालिकेपूर्वीच संबंधित बांधकाम व्यावसायिकाने ते पाडले. या प्रकरणी आयुक्तांनी माहिती मागवली आहे. पिंपरीगावातील नवमहाराष्ट्र विद्यालय ते रेल्वे स्थानक या दरम्यान पाच स्वच्छतागृहे पाडण्यात आल्याचे वाघेरे यांनी सांगितले. यात सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला. मुळातच आपण पुरेशा सुविधा देत नसताना, असलेली स्वच्छतागृहे पाडणे चुकीचे आहे. स्वच्छतागृहे पाडण्याचे उद्योग संगनमताने चालतात. त्यात काही राजकीय मंडळींचे स्वारस्थ आहे, असे ते म्हणाले. पीएमपीची अवस्था आजारी रुणाप्रमाणे असल्याचे सांगत बसस्थांबे उभारण्यासाठी सदस्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले.
आयुक्त जाणार स्पेन दौऱ्यावर
‘वाढते नागरिकीकरण व त्यामुळे होणाऱ्या समस्या’ या विषयावरील प्रशिक्षणासाठी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी २२ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या दरम्यान स्पेन दौऱ्यावर जाणार आहेत. या प्रशिक्षणाचाच एक भाग म्हणून २२ व २३ ऑगस्टला हैदराबाद येथे प्रशिक्षण शिबिरात ते सहभागी होणार आहेत. यासाठी दोन लाख ६९ हजार रुपये खर्च होणार असून त्यास स्थायी समितीने मान्यता दिली.