मौज मजा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या टिक-टॉक स्टार आणि त्याच्या मित्राला गुन्हे शाखा युनिट १ च्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण जवळपास चार लाख रुपयांच्या १० दुचाकी हस्तगत केल्या आहेत. राहुल मोहन पवार वय-१९असे टिक-टॉक स्टारचे नाव असून त्याचा मित्र स्वप्नील राजू काटकर वर- १९ अशी दुचाकी चोरण्यामध्ये सहभागी असलेल्या आरोपी मित्राचे नाव आहे.
हे दोघे खडकी, सांगवी आणि भोसरी एमआयडीसी परिसरात उभ्या केलेल्या दुचाकी चोरत होते. दिवसभर दुचाकीवर फिरून मौज मजा करून झाल्यानंतर दुचाकी भोसरी येथील पुलाखाली उभी करत असे, असं पोलिसांना त्यांनी सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिक-टॉक स्टार राहुल हा स्वप्ननीलसह भोसरी येथील मुख्य पुलाखाली दुचाकी घेऊन थांबल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस कर्मचारी गणेश सावंत आणि नितीन खेसे यांना मिळाली. त्यानुसार संबंधित ठिकाणी पथकातील इतर कर्मचाऱ्यांसह सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले. दोघांकडे मिळालेल्या दुचाकी चोरीच्या असल्याचं पोलीस तपासात समोर आल्यानंतर अधिक चौकशी केली असता त्यांनी दहा दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे.
खडकी, सांगवी आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील ८ गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. टिकटॉक स्टार राहुल पवार हा व्हिडीओ करता वेगवेगळ्या दुचाकी वापरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, काळूराम लांडगे यांच्यासह सचिन उगले, गणेश सावंत, रवींद्र गावडे, विजय मोरे, विशाल भोईर, नितीन खेसे यांच्या पथकाने केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 10, 2020 5:16 pm