विवेकवादी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते आणि सामाजिक कृतज्ञता निधीचे आधारस्तंभ ताहेरभाई पूनावाला (वय ९५) यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगी आणि नात असा परिवार आहे. पूनावाला यांच्या पार्थिवाचे मंगळवारी (१ ऑगस्ट) हडपसर येथील साने गुरुजी रुग्णालय येथे सकाळी दहा वाजता देहदान करण्यात येणार आहे. त्यापूर्वी त्यांचे पार्थिव एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन येथे सकाळी साडेनऊ वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

ताहेरभाई पूनावाला यांचा जन्म दाऊदी बोहरा समाजातील कुटुंबामध्ये झाला. सुधारणावादी बोहरा चळवळीसाठी त्यांनी घेतलेली मेहनत ही विशेष उल्लेखनीय आहे. सैय्यदना साहेब यांचे या समाजावर असलेले वर्चस्व त्यांनी झुगारून दिले. त्याचा परिणाम म्हणून समाजाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता. बोहरी आळीतील त्यांच्या दुकानातील नोकर काम सोडून गेले. व्यापाऱ्यांशी संबंध दुरावले. पूनावाला यांच्यासमवेत असलेल्या लोकांवरही बहिष्कार टाकण्यात आला होता. मात्र, काहींनी माफी मागून त्यातून मार्ग काढला. पूनावाला आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. हा बहिष्कार त्यांनी आनंदाने स्वीकारला.

विज्ञानवादी दृष्टिकोन बाळगणारे पूनावाला धर्म-जातीपलीकडचा विचार करणारे होते. महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रीय एकात्मता समितीचे ते ज्येष्ठ कार्यकर्ते होते. डॉ. श्रीराम लागू आणि डॉ. बाबा आढाव यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. ते समितीचे काही काळ कोशाध्यक्ष होते. चांगल्या उपक्रमांच्या पाठीशी उभे राहून अशा व्यक्तींना अर्थसाह्य़ करण्यामध्ये पूनावाला आघाडीवर असत. दिग्दर्शक राज कपूर यांच्याशी त्यांची मैत्री होती. या मैत्रीतून त्यांनी ‘बॉबी’ चित्रपटामध्ये ग्रंथपालाची छोटीशी भूमिका केली होती. सरदार दस्तूर स्कूलच्या समितीवर त्यांनी काम केले होते. लायन्स क्लबच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला होता.