हातात कोयते घेऊन डान्स करत ‘टिक- टॉक’वर व्हिडिओ काढणे पिंपरी-चिंचवडमधील तरुणांना महागात पडले आहे. सांगवी पोलिसांनी या प्रकरणी चार तरुणांवर गुन्हा दाखल केला असून यातील दोन जणांना अटक करण्यात आली आहे. अभिजित संभाजी सातकर (वय २२), शंकर संजय बिराजदार अशी या आरोपींची नावे आहेत.

पिंपळे निलख येथील तरुणांनी टिक- टॉक अॅपवर संजय दत्तच्या ‘अरे पकडनेकी बात छोड अपुन को टच भी नहीं कर सकता’, या प्रसिद्ध डायलॉगवर नृत्य करतानाचा व्हिडिओ तयार केला होता. या व्हिडिओत तरुणांच्या हातात कोयता देखील होता. हा व्हिडिओ पोलीस कर्मचारी पिसे यांच्या हाती लागल्यानंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक साळुंखे यांची मदत घेऊन तपासाला सुरुवात केली. अखेर पोलिसांनी या व्हिडिओतील चार जणांपैकी दोन जणांना अटक केली आहे. तर त्यांच्या एका साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. या व्हिडिओतील चौथा मुलगा अल्पवयीन आहे. या सर्वांवर आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून यांच्यावर आणखी काही गुन्हे दाखल आहेत का याचा शोध पोलीस घेत आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे,गुन्हे पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, गेले दोन दिवस होणाऱ्या पोलीस कारवाईमुळे टिक-टॉकवर असे व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांवर वचक निर्माण होईल, अशी आशा वर्तवली जात आहे.