03 December 2020

News Flash

शहरासाठी जुलैअखेपर्यंत ८.९५ टीएमसी पाणीसाठा मंजूर – कालवा समिती

पुणे शहरासाठी ३१ जुलैपर्यंत ८.९५ टीएमसी पाणी देण्याच्या निर्णयामुळे सध्या ज्या पद्धतीने शहराला पाणीपुरवठा सुरू आहे त्याच पद्धतीने पुढेही पाणीपुरवठा सुरू राहील.

| January 10, 2015 03:13 am

पुणे शहरासाठी ३१ जुलैपर्यंत ८.९५ टीएमसी पाणी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कालवा समितीच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. या निर्णयामुळे सध्या ज्या पद्धतीने शहराला पाणीपुरवठा सुरू आहे त्याच पद्धतीने पुढेही पाणीपुरवठा सुरू राहील. शहराला पुरेसा पाणीपुरवठा करण्याबरोबरच गळती रोखण्यासाठी देखील प्रभावी उपाययोजना करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली आणि गळती रोखण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.
शहराच्या पाणीपुरवठय़ाबाबत गुरुवारी कालवा समितीची बैठक पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महापौर दत्तात्रय धनकवडे, जलसंपदामंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, आमदार माधुरी मिसाळ, राहुल कुल, बाबुराव पाचर्णे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, नगर अभियंता प्रशांत वाघमारे, पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात सध्या जो पाणीसाठा आहे त्याचा आढावा घेऊन ३१ जुलैपर्यंत पाणी देण्याचे नियोजन करण्याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात आला. धरणात सध्या २०.६४ टीएमसी एवढा पाणीसाठा असून त्यातून शहराला ८.९५ टीएमसी पाणी दिले जाईल. कोणत्याही परिस्थितीत शहराला पाणी कमी पडू देणार नाही, असे बापट यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. पाऊस लांबला, तर धरणातील पाणीसाठय़ात घट होते, ही परिस्थिती लक्षात घेऊन या वेळी योग्य ते नियोजन करण्यात आले आहे. योग्य नियोजनामुळे यंदा ही परिस्थिती उद्भवणार नाही. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कालव्यातून पाण्याची गळती फार मोठय़ा प्रमाणावर होते. त्याची दखल शासनाने घेतली आहे. गळती थांबवण्याच्या दृष्टीने पाटबंधारे विभागाला सूचना देण्यात आल्या असून त्यानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुरुस्ती केली जाणार असल्याचेही बापट यांनी सांगितले.
मुळशी धरणातून पाणी मिळवणार
मुळशी धरणात दरवर्षी २२ टीएमसी पाणीसाठा होतो. हे पाणी वीजनिर्मितीसाठी वापरले जाते. ही वीज मुंबईला आणि रेल्वेला पुरवली जाते. तसा करार टाटा कंपनीबरोबर झालेला आहे. हे पाणी पुणे शहराला दिले जात नाही. तीव्र टंचाईमुळे एक टीएमसी पाणी या धरणातून पुण्याला देण्यात आले होते. आगामी काळात मुळशीतून पुण्याला पाणी मिळावे यासाठी प्रयत्न केले जातील, असेही बापट यांनी सांगितले.

शिरोळे यांच्या प्रश्नांवर अधिकारी निरुत्तर
खासदार अनिल शिरोळे यांनी कालवा समितीच्या बैठकीत केलेल्या भाषणाची आणि त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची चांगलीच चर्चा बैठकीनंतर होती. दरवर्षी देशाला २५ हजार कोटी रुपयांचे राष्ट्रीय उत्पन्न देणाऱ्या पुणे शहराच्या पाणीपुरवठय़ा बाबत दरवेळी दुजाभाव का केला जातो, असा प्रश्न शिरोळे यांनी बैठकीत उपस्थित केला होता. शहराला दिले जाणारे पाणी नक्की कोठून मोजले जाते, पाण्याची गळती नेमकी किती होते, कालव्यातून होणाऱ्या गळतीचे काय, या शिरोळे यांच्या प्रश्नांवर अधिकारी निरुत्तर झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2015 3:13 am

Web Title: till july end pune will get 8 95 tmc water
Next Stories
1 ..तर स्वतंत्र मराठी विद्यापीठाची आवश्यकताच भासणार नाही – डॉ. न. म. जोशी
2 रिंग रोडसाठी शासनाकडून महापालिकेला सवलत मिळणार
3 स्वच्छ भारत अभियानात राष्ट्रनिर्मितीची ताकद- जावडेकर
Just Now!
X