21 September 2020

News Flash

पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांवर वेगळे व्यवसाय करण्याची वेळ

करोना संसर्गाचा परिणाम

करोना संसर्गाचा परिणाम

पुणे : करोना संसर्गामुळे पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. गेल्या चार-पाच महिन्यांपासून पर्यटन क्षेत्र संपूर्णपणे बंद असल्याने या क्षेत्रातील मध्यम आणि छोटय़ा व्यावसायिकांना आता उत्पन्नासाठी वेगळे व्यवसाय करावे लागत आहेत.

करोना विषाणू संसर्गामुळे मार्चपासून टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर पर्यटन व्यवसाय ठप्प झाला. गेल्या महिनाभरापासून टाळेबंदी हटवण्यात आली असली, तरी प्रवासावरील निर्बंध अद्यापही कायम आहेत. त्यामुळे पर्यटन व्यवसाय सुरू होऊ शकलेला नाही. सहली न झाल्याने अनेक ग्राहक पैसे परत देण्याची मागणी पर्यटन व्यावसायिकांकडे करत आहेत. पर्यटन ठप्प असल्याने या क्षेत्रातील व्यावसायिकांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी मध्यम आणि छोटय़ा व्यावसायिकांनी उत्पन्नासाठी वेगळे व्यवसाय सुरू केले आहेत.

देशापरदेशात सहली आयोजित करणारे प्रवीण घोरपडे, विजय मंडलिक, सुरेंद्र कुलकर्णी, मंदार सत्रे हे चार व्यावसायिक एकत्र येऊन गेल्या दोन महिन्यांपासून भाजीचा व्यवसाय करत आहेत. ‘जानेवारी—फेब्रुवारीदरम्यान करोना संसर्गाची कुणकुण लागल्यावर आम्ही नव्या सहलींची नोंदणी कमी केली. मात्र, मार्चपासून व्यवसायच बंद झाल्याने उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. त्यामुळे घर चालवण्यासाठी आम्ही भाजीचा व्यवसाय सुरू केला. मार्चपूर्वी नोंदणी के लेल्या ग्राहकांच्या तिकिटाचे पैसे विमान कंपन्यांनी परत न देता वर्षभरात प्रवास करण्याची मुभा दिली आहे. मात्र, आम्ही वेळीच नोंदणी कमी केल्याने ग्राहकांचे पैसे आमच्याकडे अडकण्याचे विशेष प्रकार घडले नाहीत. पर्यटन व्यवसाय लवकरात लवकर सुरू व्हावा अशी अपेक्षा आहे. पण एकूण परिस्थिती पाहता नोव्हेंबर-डिसेंबपर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही,’ असे घोरपडे यांनी सांगितले. ‘साधारणपणे फेब्रुवारीपासून पर्यटक ठरवलेल्या सहली रद्द करू लागल्याने नुकसान होण्यास सुरुवात झाली होती. टाळेबंदीनंतर तर व्यवसाय पूर्णपणे बंद झाला. पर्यटन क्षेत्रातील सुमारे ७० ते ८० टक्के व्यावसायिक वाहने उपलब्ध करणे, तिकिटे काढणे, सहली नियोजित करणे अशा ठरावीक सेवा देतात. टाळेबंदीमुळे या व्यावसायिकांची मोठी आर्थिक अडचण झाली. माझा व्यवसायही बंद झाल्याने इंदूरच्या नमकीन उत्पादनांची विक्री सुरू के ली. त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळे आता या व्यवसायाकडे नवी संधी म्हणून पाहत आहे. पर्यटन व्यवसाय सुरू होण्यास किमान चार महिने लागणार आहेत. त्यामुळे पर्यटन व्यवसाय सुरू झाल्यावरही नमकीन उत्पादन विक्रीचा व्यवसाय सुरूच ठेवणार आहे,’ असे विकास अगरवाल यांनी सांगितले.

आतापर्यंतच्या वेगवेगळ्या पाहणीतून लोकांना लगेच बाहेर फिरण्याची इच्छा असल्याचे दिसून आले आहे. पण प्रवासावर निर्बंध आहेत. आताच्या घडीला रेल्वे उपलब्ध नाहीत, विमानांची संख्या कमी झाली आहे. तसेच लोकांमध्ये करोनाची अजूनही भीती आहे. साधारणपणे दिवाळीनंतर लोक बाहेर पडू लागतील असा अंदाज आहे. तोपर्यंत ‘करोना’वरील लस येण्याची अपेक्षा आहे. पण ‘करोना’मुळे बसलेला फटका मोठा आहे.

– नितीन शास्त्री, पर्यटन व्यावसायिक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2020 3:51 am

Web Title: time to do different business for professionals in the tourism sector zws 70
Next Stories
1 ऑगस्टअखेर ३८ हजार उपचाराधीन रुग्ण
2 समाजमाध्यमावर मटक्याचे आकडे
3 हिमाचल प्रदेशातील सफरचंदाची आवक सुरू
Just Now!
X