राज्यात दुष्काळी स्थिती असताना या वेळचा गणेशोत्सव साजरा होत असून, या परिस्थितीत दुष्काळग्रस्त भागाला मदत करण्यासाठी मंडळांकडून वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. लग्नाचा खर्च वाचवण्यासाठी सामूदायिक विविहांचा खर्च उचलणे, जनावरांसाठी चारा व खाद्य पुरवणे आणि पाणी पुरवण्यासाठी यंत्रणांना मदत करणे ही मुख्य कामे हाती घेण्यात येत आहेत.पुण्यासह अनेक जिल्ह्य़ांमध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. पावसाचे प्रमाण निम्म्याच्या आसपास आणि धरणांचा साठासुद्धा निम्म्याच्या आसपास आहे. त्यामुळे अनेक बागात बिकट परिस्थिती आहे. या पाश्र्वभूमीवर गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा केला जाणार, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, अनेक मंडळांनी उत्सव साजरा करताना सामाजिक परिस्थितीचे भान ठेवले असल्याचे सांगितले. याबाबत प्रातिनिधिक मंडळांशी चर्चा केली. त्यांनी त्यांच्याकडून दुष्काळासाठी केल्या जात असलेल्या गोषअटींचा माहिती दिली.मानाच्या दगडूशेठ हलवाई ट्रस्ट मंडळाकडून गेली चार वर्षे पुणे जिल्ह्य़ातील दुष्काळी पट्टय़ातील गावात विविध गोष्टींसाठी मदत केली जात आहे. त्यातून पिंगोरी या गावाचा सर्वागीण विकास करण्यासाठी मंडळाने मोठा मदत केली. त्याचबरोबर या वर्षीची स्थिती पाहता, जनावरांची जबाबदारी उचलण्याचे मंडळाने ठरवले आहे. ‘‘शासनाकडून माणसांची काळजी घेतली जाईल, पण जनावरांच्या खाद्याचा मोठा प्रश्न तसा असेल. त्यासाठी चारा व त्यांचे खाद्य पुरवण्यावर आमचा भर असेल. आमच्यासोबत इतरही मंडळांना या मोहितेच सहभागी होण्याचे आवाहन करणार आहोत. आणखी काही ठोस कार्यक्रम घेऊन लोक पुढे आले, तर त्यावराही काम केले जाईल,’’ असे या मंडळाचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी सांगितले.अखिल मंडई मंडळाकडूनही यावर काम केले जात आहे. मंडळाच्या प्राथमिक बैठकीत त्यावर चर्चा झाली आहे. ‘‘मंडळाच्या वतीने जनावरांसाठी काही करता आले तर करायचे आहे, कारण ती मरण्याच्या स्थितीत आली आहेत. गणेशोत्सवाला अजून वेळ असला आधीच हा उपकम करणार आहोत. त्याचप्रमाणे इतर मंडळांना यात सहभागी होण्याचे आवाहन करणार आहोत,’’ असे मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांना सांगितले.

सेवा मित्र मंडळ, आदर्श मित्र मंडळ आणि एक पकसंस्था मिळून एक मोठे गाव निवडण्याचा विचार आहे. त्या व आजूबाजूच्या गावांमध्ये मिळून एक सामूदायिक विवाह सोहळा घेणार आहोत. अजूनही पावसाची आशा आहे. त्यामुळे इतरांकडून थोडा उशिराने प्रतिसाद मिळेल.
– शिरीश मोहिते अध्यक्ष, सेवा मित्र मंडळ, शुक्रवार पेठ

मंडळाच्या बैठकीत दुष्काळाचा विषय निघाला. देखाव्यावर खर्च कमी करू. चांगल्या लोकांशी चर्चा करून मदतीचे स्वरूप ठरवणार आहोत. चिंचवड विभागातील मंडळांची बैठक होणार आहे, त्यातही हा विचार मांडणार आहोत. एकत्र येऊन मोठी मदत उभी करण्याचा विचार आहे.’’
– राजाभाऊ गोलांडे,अध्यक्ष, गांधी पेठ तालीम मित्र मंडळ, चिंचवड

पाणी या विषयावर देखावा करण्याचा विचार  आहे. या वर्षांपासून सामूदायिक विवाह सोहळा सुरू करणार आहोत. सध्या पिण्यासाठीचे पाणी इतर कामांसाठी वापरले जाते. त्याऐवजी बोअर घेऊन ते पाणी वापरण्यासाठी उपयोगात आणता येईल.’’
– दिलीप गिरमकर,अध्यक्ष, हिंद तरूण मंडळ, लष्कर