राजकारणात सकस हस्तक्षेप करू शकतील अशा चळवळी नसल्याने राजकारण सुधारण्याची ताकद आपण गमावून बसलो. राजकारणाच्या बाहेर राहून राजकारण सुधारणे दुरापास्त आहे. म्हणून चळवळींना राजकारणात जावे लागेल व दीर्घकाळ राजकारण करायचे असेल तर राजकारण्यांनाही चळवळीशी जोडून घ्यावे लागेल, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. सुहास पळशीकर यांनी व्यक्त केले.
‘साधना’ साप्ताहिकाच्या ६६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पळशीकर यांच्या ‘राजकारणाचा ताळेबंद’ या पुस्तकाचे प्रकाशन ‘आयबीएन लोकमत’ चे संपादक निखिल वागळे यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्यानंतर वागळे यांनी पळशीकर यांची मुलाखत घेतली. त्या वेळी पळशीकर बोलत होते. ‘साधना’चे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर, कार्यकारी संपादक विनोद शिरसाठ त्या वेळी उपस्थित होते.
लोकशाही व राजकारणाबाबत पळशीकर म्हणाले,‘‘सध्या राजकारणातून काही निष्पन्न होणार की नाही, ही शंका वाढते आहे. संस्थाकरणाला सुरुवातीच्या काळात मिळणारे बळ कमी झाले. त्यामुळे लोकशाही संस्थांची वाढ खुंटली. जात, धर्म, भाषा व वसाहतवादाने राजकारणाला प्रतिकार व प्रतिवादाचा पैलू मिळाला. हे राजकारण कुठवर चालवायचे हे कळले नाही.’’   
राजकारणाबाबत ते म्हणाले,‘‘एखादा लोकप्रतिनिधी लोकांची कामे करतो, पण दुसरीकडे त्याची संपत्तीही वाढत असते, ही खरी समस्या आहे. राजकारणात लोक स्वार्थ व हितासाठी जात असतात. पण, त्यांचे स्वार्थाचे वर्तुळ किती मोठे आहे, यावर त्यांच्या राजकारणाचे यशापयश अवलंबून असते. कंत्राटदार, दलाल व सेवा पुरविणारा म्हणून कार्यकर्ते स्वत:ला पाहत असतील, तर पंचायत होते. स्वत:चे व्यवसाय व राजकारण यात गल्लत होते आहे. कार्यकर्ते घडविण्याची प्रक्रिया थांबल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. सध्या लोकांच्या हिताचे कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचविण्याची राजकीय कौशल्यं कमी झाली आहेत.’’
नरेंद्र मोदी यांच्याविषयी ते म्हणाले,की लोकशाहीमध्ये तोच तोपणा आल्यानंतर लोकशाहीचे आकर्षण कमी होते. त्या वेळी काहीतरी वेगळे म्हणून कुणी पुढे येते, त्यात मोदींचा समावेश आहे. इतर देशांतही असे होत असते. लोकांपर्यंत हिंदूुत्व पोहचविण्याचे त्यांचे माध्यम राष्ट्रवाद हे आहे. विकास, हिंदूू राष्ट्रवाद व काँग्रेसमुक्त भारत ही त्यांची तीन शस्त्रे आहेत. राहुल गांधी व मोदी ही माध्यमांनी लढविलेली लढत आहे. ती मोदी यांच्या फायद्याचीच आहे. राहुल गांधी यांनी नेता म्हणून अद्याप कौशल्य दाखविलेले नाही. त्यांना पक्षातूनच हवा तसा प्रतिसाद मिळत नाही.