आज इंदिरा गांधी असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो भाजपामध्ये नाही असे म्हणत अभिनेते आणि भाजपा नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्याच पक्षावर टीका केली. माझे मित्र सुनील दत्त हे काँग्रेसमध्ये होते. इंदिरा गांधी यांच्याशी माझ्या उमेदीच्या काळात भेटण्याचा योग आला होता. त्या मला मानत असत त्या असत्या तर मी भाजपामध्ये कधीही गेलो नसतो मी काँग्रेसमध्येच असतो असे शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले आहे. पुण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे भाष्य केले आहे. या कार्यक्रमात त्यांच्यासोबत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीही हजेरी होती.

भाजपाचे जेव्हा दोन खासदार होते तेव्हापासून मी या पक्षासोबत आहे. मात्र सध्या देशाचा कारभार हा वन मॅन शो किंवा टू मॅन शो सारखा सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरातल्या देशांमध्ये भाषण देतात. मात्र जनतेला भाषणाची नाही रेशनची गरज जास्त आहे असे परखड मत शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केले. तसेच मी कधीही मनकी बात बोलणार नाही पण मला जे वाटते ते मी बोलणार. मन की बातचा पेटंट माझ्याकडे नाही असेही सिन्हा यांनी सुनावले.

सध्याचे वातावरण बेटी पढाओ पेक्षाही बेटी बचाओ असे जास्त आहे असे म्हणत त्यांनी उन्नाव, कठुआ आणि सुरतमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनांचा तीव्र निषेध केला. मी FTII चा विद्यार्थी आहे. मला मराठी फार चांगल्या पद्धतीने समजते. जय महाराष्ट्र म्हणत मी आयुष्यभर महाराष्ट्राच ऋणी राहिन असेही शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले आहे.

केंद्राच्या निवडणुकीपूर्वी देशात १०० स्मार्ट सिटी उभारणार त्याचे आजअखेर काही झाले नसून देशभरात सध्या शौचालय उभारण्याचे नागरिकांना आवाहन केले जात आहे.जे आवाहन करत त्यांनीच बिहारमध्ये १०० कोटींचा घोटाळा केला आहे.असा यांचा कारभार असून हे पाहून मला दुःख वाटते.ज्यांनी पारदर्शकता कारभारमध्ये असणार असे आश्वसन दिले होते.कुठे गेली पारदर्शकता असा सवाल भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुण्यातील कार्यक्रमात उपस्थित करीत भाजपाला घरचा आहेर देत येणाऱ्या काळात नक्कीच परिवर्तन होईल.असे संकेत देखील त्यांनी यावेळी दिले. पुण्यात वसंत दादा सेवा संस्थेच्या वतीने ‘२०१४ नंतरचा भारताचा विकास किती खरा किती खोटा?’ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.