स्मार्ट सिटी प्रकल्पाचा शहराचा आराखडा केंद्राला पाठवण्यासंबंधीचा अंतिम निर्णय महापालिकेच्या सोमवारी (१४ डिसेंबर) होत असलेल्या सभेत होणार असून आराखडा पाठवण्याच्या प्रस्तावाला राष्ट्रवादी व काँग्रेसकडून काही उपसूचना दिल्या जातील. या उपसूचनांसह मूळ आराखडा केंद्राकडे पाठवला जाण्याची शक्यता आहे.
स्मार्ट सिटीचा आराखडा राज्य शासनामार्फत मंगळवार (१५ डिसेबर) पर्यंत केंद्र सरकारला सादर होणे आवश्यक असल्यामुळे सोमवारी बोलावण्यात आलेल्या सभेतच याबाबतचा निर्णय महापालिकेला घ्यावा लागणार आहे. मात्र हा प्रकल्प राबवण्यासाठी जी स्वतंत्र कंपनी (स्पेशल पर्पज व्हेईकल- एसपीव्ही) स्थापन केली जाणार आहे या कंपनीला काँग्रेसने विरोध केला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या प्रस्तावावर मतदान झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि  शिवसेना यांचे एकमत होणे आवश्यक आहे. मनसेने या प्रस्तावाला यापूर्वीच विरोध केला आहे.
स्मार्ट सिटीसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन झाल्यास लोकप्रतिनिधींच्या हक्कावर गदा येणार असल्याचे सांगत या प्रस्तावाला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेने विरोध केला आहे. त्यामुळे या राजकीय पक्षांच्या बठका सतत सुरू आहेत. या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी नगरसेवकांच्या बैठका घेत त्यांची मते जाणून घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाबाबत या बैठकीत नगरसेवकांनी चर्चा केली. पक्षाची अधिकृत भूमिका अद्याप जाहीर झाली नसली, तरी महापालिकेची स्वायत्तता कायम ठेवून या आराखडय़ाला मंजुरी द्यावी, अशी उपसूचना सभेत राष्ट्रवादीकडून दिली जाईल. स्मार्ट सिटीसाठी स्थापन कराव्या लागणाऱ्या एसपीव्हीला सभेत विरोध करण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. मात्र स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाला मंजुरी द्यायची की विरोध करायचा या संबधीचा निर्णय सभागृहात घेतला जाईल असे काँग्रेसकडून रविवारी सांगण्यात आले. या विषयाबाबत काँग्रेसची बैठक रविवारी बोलावण्यात आली होती. स्मार्ट सिटीसाठी जी कंपनी स्थापन करावी लागणार आहे, त्यात त्रुटी असल्याचे नगरसेवकांनी यावेळी सांगितले. स्थायी समितीच्या बठकीत आयुक्तांनी जो प्रस्ताव ठेवला होता, त्यात चुकीची माहिती देण्यात आली होती. स्वतंत्र कंपनीला करवाढीचा अधिकार नाही असे आयुक्तांनी सांगितले होते, असे यावेळी सांगण्यात आले.
स्मार्ट सिटीचा प्रस्ताव मान्य झाला पाहिजे यासाठी भाजप आणि शिवसेनेकडूनही प्रयत्न करण्यात येत आहेत. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटी घेऊन प्रस्तावाला पािठबा देण्यासाठी विनंती केली. भाजपचे महापालिकेतील गटनेता गणेश बीडकर म्हणाले, स्मार्ट सिटीचा प्रस्ताव सभागृहामध्ये मान्य व्हावा यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.
उपसूचनांची व्यूहरचना
महापालिकेच्या सोमवारी (१४ डिसेंबर) होत असलेल्या सभेत स्मार्ट सिटी प्रकल्पाला उपसूचना देऊन नंतर हा प्रस्ताव मान्य करण्याची व्यूहरचना सत्ताधाऱ्यांनी तयार केली आहे. स्मार्ट सिटीमुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर गदा आणू नये, स्वतंत्र कंपनीमध्ये राजकीय सभासदांची संख्या वाढवावी आदी उपसूचना दिल्या जातील. तसेच स्वतंत्र कंपनीला विरोध करणारी उपसूचनाही सभेत येण्याची शक्यता आहे. मात्र या उपसूचनांसह मूळ प्रस्ताव मान्य झाल्यास केंद्राकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन होण्याची शक्यता आहे. मात्र प्रस्ताव उपसूचनांसह मंजूर केला जाणार असल्याची माहिती वरिष्ठ नेत्यांनी दिली.