दारू-मटणासाठी नको त्यांच्या मागे लाचार होऊन फिरणारी पिढी पाहिल्यानंतर ती कसली तरुणाई, असा प्रश्न पडतो. ३९ वर्षांच्या आयुष्यात स्वामी विवेकानंद यांनी दिलेले अत्युच्च योगदान पाहता त्यांचा आदर्श तरुणांनी घेतला पाहिजे, असे मत व्याख्याते विवेक घळसासी यांनी चिंचवड येथे बोलताना व्यक्त केले. आधी शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात घुसलेले लुटारू आता परमार्थातही घुसले आहेत, असे सांगतानाच काहीही काम न करता पुढारी मंडळी थकतात कशी, असा मुद्दा घळसासी यांनी या वेळी उपस्थित केला.
गांधी पेठ तालीम मित्र मंडळाच्या वतीने आयोजित जिजाऊ व्याख्यानमालेत ‘स्वामी विवेकानंद आणि युवकांची प्रेरणा’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी आमदार लक्ष्मण जगताप, भाजप नेते अमर साबळे, नगरसेविका जयश्री गावडे, माजी नगरसेवक राजू गोलांडे, गजानन चिंचवडे, सुहास पोफळे, सुरेश भोईर आदींसह मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते. दीड तास चाललेल्या या व्याख्यानात घळसासी यांनी सध्याची तरुण पिढी, राजकारणी, समाजव्यवस्था, पालक वर्ग, भ्रष्टाचार आदी विषयांवर घळसासी यांनी विविध उदाहरणे देत परखड भाष्य केले.
घळसासी म्हणाले, प्रामाणिकपणा, प्रखर मनोनिग्रह, तीक्ष्ण बुद्धिमत्ता, ब्रह्मचर्य, शारीरिक सामथ्र्य या गुणांमुळे स्वामी विवेकानंदांचे जीवन निष्कलंक राहिले. दीड हजार वर्षे पुरेल एवढी ज्ञानसंपदा त्यांनी विचारसाधनेतून निर्माण केली.