साप म्हटलं की भीतीने अंगावर काटाच येतो. एखाद्या सोसायटीत किंवा घरात साप आल्यास सर्वाची धांदल उडते. साप चावल्यास मनुष्य मरतोच, या गैरसमजातून सापांना मारले जाते. परंतु सापाचे निसर्गातील स्थान महत्त्वाचे असून अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी काही सर्पमित्र सरसावले असून समाजमाध्यमांचा वापर करत व्हॉट्सअ‍ॅपवर समाज प्रबोधनाची एक चळवळ उभी केली आहे. या सर्पमित्रांच्या गटाविषयी..

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर हे आजच्या पिढीच्या जगण्यातले परवलीचे शब्द झालेत. आपल्यापैकी अनेकांना पुस्तकं,वर्तमानपत्रं वाचनाचा कंटाळा येतो, पण व्हॉटसअ‍ॅपवर आलेले मेसेज आपण आवडीने वाचतो आणि शेअरही करतो. समाज माध्यमांची हीच ताकद ओळखून साप आणि वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या ‘वाइल्ड अ‍ॅनिमल्स अ‍ॅण्ड स्नेक प्रोटेक्शन सोसायटी’

या संस्थेतर्फे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून सापांना वाचविण्यासाठी, तसेच साप आढळल्यास विषारी की बिनविषारी, साप चावल्यास उपचार काय करावे याविषयी प्रबोधन केले जाते.

प्रत्यक्ष घरात, परिसरात कोणत्याही जातीचा साप आढळल्यास त्याला सर्रास मारले जाते. ही स्थिती बदलण्यासाठी २००८ साली ‘वाइल्ड अ‍ॅनिमल्स अ‍ॅण्ड स्नेक प्रोटेक्शन सोसायटी’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. सर्पमित्रांद्वारे सापांचे जीव वाचवून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे काम करण्यात येत होते. परंतु प्रत्येक वेळी सर्पमित्र पोहोचेलच असे नाही, मग अशा वेळी घाबरून न जाता काय केले पाहिजे याविषयी लोकांमध्ये प्रबोधन संस्थेमार्फत केले जाते. हळूहळू संस्थेचे काम वाढत गेले व अनेक सर्पमित्र जोडत गेले. या सर्पमित्रांना साप पकडण्याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण तसेच ओळखपत्र देण्यात आले असून शहरातील विविध भागांत सर्पमित्र तयार करण्याचे काम संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

संस्थेच्या कामाविषयी ‘वाइल्ड अ‍ॅनिमल्स अ‍ॅण्ड स्नेक प्रोटेक्शन’ सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद कांबळे म्हणाले, की सध्या संस्थेच्या १६० सर्पमित्रांचा गट शहराच्या विविध भागात काम करत आहे. एखाद्या परिसरात साप निघाल्यास त्या भागात काम करणाऱ्या सर्पमित्राला त्याची माहिती दिली जाते. तो सर्पमित्र तेथे पोहोचून सापाला सुरक्षित ठिकाणी सोडतो. यासाठी सर्पमित्रांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही. दरवर्षी साधारण २००० ते २५०० सापांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले जाते. यामध्ये समाजमाध्यमांची महत्त्वाची भूमिका आहे. आपल्या जवळील भागातील सर्पमित्रांविषयी माहिती पोहोचवण्याचे काम व्हॉट्सअ‍ॅपद्वारे केले जाते. संस्थेचे पुणे सर्पमित्र, पिंपरी-चिंचवड सर्पमित्र नावाचे व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप आहेत. व्हॉट्स अ‍ॅपवर एखाद्या भागात सर्पमित्र नसल्यास त्याची माहिती टाकल्यास त्वरित तेथील जवळील भागातील सर्पमित्र मदतीसाठी जातात. फक्त सर्पमित्रच नाहीत, तर एखादा पक्षी जखमी झाल्यास त्यासाठी पक्षीप्रेमी देखील गटात आहेत.

सर्पमित्रांनी पकडलेल्या सर्व सापांविषयी माहिती भांबुर्डा वनविभागाला कळविण्यात येते व त्यांच्या सूचनेनुसार सापाला सुरक्षित ठिकाणी सोडले जाते. शाळा, महाविद्यालये, सोसायटीमध्ये, कंपनीमध्ये जनजागृतीसाठी विविध उपक्रम संस्थेतर्फे राबविण्यात येतात. नागरिकांच्या मनातील सापांविषयी असणारी भीती व गैरसमज दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती देखील व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून लोकांपर्यत पोहोचविण्यात येत असल्याचे कांबळे यांनी सांगितले. आपल्या परिसरातील सर्पमित्र व संस्थेच्या अधिक माहितीसाठी ८७८८८५९६९६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कांबळे यांनी केले आहे.