स्वच्छतेच्या कामांच्या निविदांना मंजुरी; सहा नाटय़गृहे, कलादालनांच्या स्वच्छतेसाठी ठेके

शहरातील नाटय़गृहे आणि कलादालनातील स्वच्छतागृहांच्या दैनंदिन स्वच्छतेच्या रखडलेल्या कामांना गती मिळणार आहे. नाटय़गृहे आणि कलादालनातील स्वच्छतागृहांच्या साफसफाईसाठीची कामे करण्यासाठीच्या फेरनिविदांना स्थायी समितीने गुरुवारी मान्यता दिली. त्यानुसार सहा नाटय़गृहे आणि कलादालनांच्या स्वच्छतेसाठीचे ठेके संबंधितांना देण्यात येणार आहेत. नाटय़गृहातील दैनंदिन स्वच्छतेच्या कामांमधील सर्व अडथळे दूर झाल्यामुळे आता तरी नाटय़गृहात नियमित स्वच्छता होणार की पुन्हा काही अडथळे येणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

शहरातील नाटय़गृहे आणि कलादालनातील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाल्यानंतर दैनंदिन स्वच्छतेच्या कामांसाठी देण्यात आलेला ठेक्याला वस्तू आणि सेवा कराचा (गुड्स सव्‍‌र्हिस टॅक्स-जीएसटी) फटका बसला होता. कलादानातील स्वच्छतेसंदर्भातील निविदा मान्य झाल्यानंतर प्रत्यक्षात कार्य आदेश (वर्क ऑर्डर) देण्याची वेळ आली असतानाच या निविदेमध्ये जीएसटीचा समावेश नसल्यामुळे काम थांबविण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली होती. त्यामुळे हा नाटय़गृहातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आल्याची बाब ‘लोकसत्ता’ने सप्टेंबर महिन्यात उघडकीस आणली होती. त्यानंतर महापालिका प्रशासनाने मौलाना अबुल कलाम आझाद सांस्कृतिक केंद्र, महात्मा फुले सांस्कृतिक भवन, बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाटय़गृह, गणेश कला क्रीडा मंच, पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन या सहा ठिकाणच्या दैनंदिन स्वच्छतेसाठी फेरनिविदा काढल्या होत्या. या फेरनिविदांना मान्यता द्यावी असा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी प्रशासनाकडून ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला स्थायी समितीने गुरुवारी एकमताने मान्यता दिली. त्यामुळे नाटय़गृहे आणि कलादालनातील दैनंदिन स्वच्छतेची कामे नियमितपणे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यशवंतराव चव्हाण नाटय़गृहातील अस्वच्छतेबाबत आणि असुविधांबाबत अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने मध्यंतरी समाजमाध्यमातून नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर शहरातील महापालिकेची नाटय़गृहे, कलादालने आणि सांस्कृतिक भवनातील स्वच्छतागृहांच्या दुरुस्ती तसेच स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या पाश्र्वभूमीवर महापौर मुक्ता टिळक यांनी काही नाटय़गृहे आणि कलादालनांची पाहणी केली होती. निविदा प्रक्रियेअभावी नाटय़गृहांमधील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाल्याचे त्या वेळी पुढे आले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनावर चोहोबाजूने टीका होण्यास सुरुवात झाली. यानंतर पालिकेने नाटय़गृहे, कलादालनातील स्वच्छतागृहांसाठी एकत्रित निविदा काढली पण त्यात जीएसटीचा विचार केला नव्हता. त्यामुळे या कामांसाठीचा ठेका देण्यास तीन महिन्यांचा विलंब झाला. फेरनिविदा मान्य करताना दोन वर्षांसाठीचे ठेके देण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली. विश्वजित एंटरप्रायझेस आणि विनर एंटरप्रायझेस या यांना हे काम विभागून देण्यात आले असून स्वच्छतेची कामे नियमितपणे होतील, असा दावा मोहोळ यांनी केला.