‘मुकुल माधव फाउंडेशन’चा पुढाकार
फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशनने मुंबईतील खेरवाडी सोशल वेल्फेअर असोसिएशनच्या सहकार्याने पालघर जिल्ह्य़ातील सोनाळे गावात ५० अत्याधुनिक शौचालये बांधली असून त्यावर सौर दिवे बसविण्यात आले आहेत. सोनाळे गावात एकूण १२३ घरे असून, त्यातील ५० घरांना पहिल्या टप्प्यात शौचालये बांधून देण्यात आली आहेत.
मुकुल माधव फाउंडेशनने सोनाळे गाव दत्तक घेतले असून चार टप्प्यात हा प्रकल्प राबविला जाणार आहे. उर्वरित ७३ शौचालये ग्रामस्थांच्या संमतीनंतर दुसऱ्या टप्प्यात बांधली जाणार आहेत. तिसऱ्या टप्प्यात ग्रामपंचायतीच्या संमतीने सौर पथदिवे तर चौथ्या टप्प्यात आरोग्यविषयक जागृती कार्यक्रम आणि शिबिरे घेतली जाणार आहे. या उपक्रमात प्रति शौचालय २४ हजार रुपये आणि सौर दिव्यांसाठी ११५० रुपये असा एकूण २५ हजार १५० रुपये खर्च प्रति शौचालयास करण्यात आला आहे.
सोनाळे गावात उभारलेली शौचालये पर्यावरणपूरक आहेत. समाजाप्रति आपण काहीतरी देणे लागतो, ही भावना रुजवण्यासाठी ग्रामस्थांकडून २००० रुपये आणि ५० रुपये सौर दिव्यासाठी वर्गणी घेऊन त्यातून जमलेली रक्कम शहीद सैनिकांच्या पत्नींसाठी कार्यरत असणाऱ्या केंद्र सरकारच्या समितीला देण्यात आली आहे.कार्यक्रमात फाउंडेशनच्या छाब्रिया म्हणाल्या, प्रत्येक घरासाठी स्वतंत्र शौचालय बांधून महिला आणि मुलींना खासगी आणि सुरक्षित आयुष्याबद्दल जागृत करण्यासाठी फाउंडेशन प्रयत्नशील आहे. अपुऱ्या सोयींमुळे अनेक आजार उद्भवतात, ही बाब लक्षात घेऊन आदिवासी पाडय़ांमध्ये शौचालय उभारण्याचा प्रयत्न संस्था करीत आहे.
कार्यक्रमात समाज कल्याण विभागाचे वाडाचे सोन्या पाटील, प्रशासकीय अधिकारी संदीप जाधव, सोनाळे गावच्या सरपंच अरुणा गुरुडे, फिनोलेक्सचे बी. आर. मेहता, मुकुल माधव फाउंडेशनचे जितेंद्र जादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 18, 2018 4:20 am