मोठा गाजावाजा करून पुकारण्यात आलेले मनसेचे ‘रास्ता रोको’ आंदोलन केवळ दाखवण्यापुरते झाल्यामुळे आणि पोलिसांनी परिस्थिती चांगल्याप्रकारे हाताळल्याने पुण्यात आंदोलनाचा विशेष परिणाम जाणवला नाही. पुणे-सातारा रस्ता शिवापूरजवळ १५-२० मिनिटांसाठी अडवल्याचा अपवाद वगळता पुण्यात येणाऱ्या सर्व महामार्गावरील वाहतूक बुधवारी सुरळीत सुरू होती. शहरात कार्यकर्त्यांनी दहा-बारा बसेसच्या काचा फोडल्या. मात्र, त्रास नको म्हणून वाहनचालक फारच कमी संख्येने बाहेर पडल्याने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सायंकाळपर्यंत अतिशय तुरळक संख्येने वाहने पाहायला मिळाली.
मनसेतर्फे भरपूर प्रसिद्धी करून आंदोलन पुकारण्यात आल्यामुळे पोलिसांनी पुणे शहर व जिल्ह्य़ातही खबरदारी घेतली होती. मुख्य पदाधिकाऱ्यांना नोटिस दिल्या होत्या, काही जणांना मंगळवारी रात्रीच ताब्यात घेतले होते. याचबरोबर शहराच्या परिसरातील व जिल्ह्य़ातील सर्व टोलनाक्यांवर मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचा परिणाम म्हणून पुण्यात आंदोलन जाणवलेच नाही. पक्षाच्या काही प्रमुख नेत्यांनी रस्त्यावर न उतरता घरातच राहणे पसंत केले. विविध महामार्गावर कात्रज, वारजे माळवाडी, हिंजवडी, हडपसर, भारती विद्यापीठ, मोशी येथे कार्यकर्त्यांनी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले. त्या वेळी कार्यकर्त्यांकडूनही विशेष प्रतिकार झाला नाही. ताब्यात घेतलेल्यांमध्ये अनिल शिदोरे, वसंत मोरे, रवींद्र धंगेकर, नाना भानगिरे, अमृत सोनावणे, राजेंद्र बोरडे, राहुल तुपेरे, रूपाली पाटील यांचाही समावेश होता. राज ठाकरे यांना मुंबईत सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी दहा-बारा बसेसच्या काचा फोडल्या आणि एका ठिकाणी बस पेटवून देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
हे आंदोलन असले तरी पुण्यात येणारे सर्वच महामार्ग सुरळीत सुरू होते. पुणे-नाशिक रस्ता व पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर आंदोलनाचा परिणाम जाणवला नाही. पुणे-नगर रस्त्यांवर एका मोटारीच्या काचा फोडण्यात आल्या. मात्र, या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला नाही. पुणे-सोलापूर रस्ता व पुणे-जेजुरी रस्त्यावरही असेच चित्र होते. पुणे-सातारा रस्त्यावर शिवापूर टोलनाक्याजवळ सकाळी साडेदहाच्या सुमारास कार्यकर्त्यांनी अर्धा रस्ता अडवला. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने आंदोलन पंधरा-वीस मिनिटांत आटोपले.
द्रुतगती रस्त्यावर तुरळक वाहने
पुणे-मुंबई द्रुतगती रस्त्यावर तसेच, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर मावळात काही ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. खालापूर, उस्रे, वरसोली, लोणावळा, वडगाव, कामशेत, तळेगाव, सोमाटणे, भंडारा डोंगर या ठिकाणी मनसेनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको व निदर्शने केल्याने पोलिसांनी शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मनसेच्या मावळ तालुका विद्यार्थी सेनेने द्रुतगती मार्गावरील अमृतांजन पुलाजवळ पहाटे सव्वाचारच्या दरम्यान वाहनांच्या टायरच्या हवा सोडल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक तासभर ठप्प झाली होती. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सोमाटणे फाटा येथे टोलनाक्याजवळही मनसे कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करीत रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला. एरवी वाहनांची प्रचंड वर्दळ असणारा एक्स्प्रेस-वे आणि जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गावर शुकशुकाट होता. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांच्या संख्येत लक्षणीय घट झाली होती.
—————–
आंदोलन करण्याअगोदरच पोलिसांनी घेतले ताब्यात                                            राज ठाकरे यांना मुंबईत ताब्यात घेतल्यानंतर पुण्यात औंध, टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता, सेव्हन लव्हज चौक, पुणे-नगर रस्ता येथे दहा ते अकरा ठिकाणी बसवर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी काही जणांस पोलिसांनी अटक केली आहे. शहरात आंदोलनामध्ये रस्ता रोको आंदोलन करणाऱ्यांवर सात गुन्हे दाखल करून साधारण १०० जणांस अटक केली तर, १९७ जणांस ताब्यात घेतले. पुणे ग्रामीणमध्ये तीन गुन्हे दाखल करून साधारण ५० जणांस अटक करून ६०० लोकांना विविध ठिकाणांहून ताब्यात घेतले. विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त एम. बी. तांबडे यांनी सांगितले, की शहरात चांदणी चौकापासून सकाळी साडेआठच्या सुमारास आंदोलनाला सुरुवात झाली. या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी बसेसची हवा सोडून दिली. या वेळी आठ जणांस ताब्यात घेऊन त्यांच्यावर वारजेमाळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
‘‘जिल्ह्य़ात एकूण ५७० जणांस ताब्यात घेतले आहे. काही किरकोळ घटना वगळता जिल्ह्य़ातील महामार्गावरील वाहतूक सुरळीत होती. जिल्ह्य़ात आंदोलनकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई टोलनाक्याजवळच करण्यात आली. आंदोलन करण्याअगोदरच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले,’’ अशी माहिती पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रवींद्रसिह परदेशी यांनी दिली.
——————–
इन मिन वीस मिनिटे अन् अर्धाच ‘रास्ता रोको’
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागील आंदोलनात पुणे-सातारा रस्त्यावरील खेड शिवापूरचा टोलनाका लक्ष्य झाला होता. त्या पाश्र्वभूमीवर रास्ता रोको होणार असल्याने या टोलनाक्यावर सकाळपासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. ‘रास्ता रोको’साठी सकाळी नऊची वेळ जाहीर केली असल्याने सकाळी साडेआठलाच टोल वसुली बंद करून टोल बूथमधील संगणक व इतर यंत्रणा घेऊन कर्मचारी तेथून निघून गेले होते. काही काळ का होईना टोल भरावा लागत नसल्याने टोलनाक्यावरून पुढे जाणाऱ्या वाहन चालकांच्या चेहऱ्यावर निराळाच आनंद होता.
आंदोलन येण्याची वाट पाहत पोलिसांचा फौजफाटाही काही काळाने रेंगाळला. मात्र, साडेदहाला साताऱ्याच्या दिशेने मोटारीतून आंदोलक आले. मनसेच्या भोर, वेल्हा, मुळशी विभागातील काही पदाधिकाऱ्यांचाही त्यात समावेश होता. कार्यकर्त्यांची संख्या पोलिसांच्या तुलनेत कमीच होती. मनसेचे झेंडे व फलक हातात घेऊन कार्यकर्ते रस्ता आडविण्यासाठी उभे राहिले. आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या काहींची भाषणे झाली.. घोषणाही झाल्या व शेवटी ‘आपण खाली बसू, पोलीस त्यांची कारवाई करतील,’ असे एकाने जाहीर केले. आंदोलक खाली बसेपर्यंत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सर्व आंदोलक घोषणाबाजी करीत पोलिसांच्या गाडीत बसले. सुमारे वीस मिनिटे चाललेल्या या ‘रास्ता रोको’मध्ये पुण्याकडे जाणारी तीसएक वाहने खोळंबली. विशेष म्हणजे आंदोलन सुरू असतानाही पुण्याकडून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक सुरूच होती.