X

हिरवा कोपरा : टोमॅटो, मिरची, वांगी कुंडीतच फुलवा

आडव्या क्रेटमध्ये मध्यम आकाराच्या कुंडीत वांगी, टोमॅटो, मिरची सहज लावता येतात.

प्रिया भिडे (सदस्य, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी)

ज्येष्ठांसाठीच्या एक गृहनिर्माण संस्थेत जाण्याचा योग आला होता. तेव्हा एका बाल्कनीने माझे लक्ष वेधून घेतले. त्या बाल्कनीतून झाडे बाहेर झेपावली होती अन् टोमॅटोच्या झाडाला टोमॅटो लगडले होते. त्या घरात जाऊन मुद्दाम आजींना भेटले. खूश झाल्या. ‘अगं, बंगल्यात मोठी बाग होती. आता होत नाही, पण चार झाडं जपली आहेत.’ छंदाला वयाचं, जागेचं बंधन नाही याचा प्रत्यय आला.

बाल्कनीमध्ये सहा ते आठ तास ऊन असेल तर आडव्या क्रेटमध्ये मध्यम आकाराच्या कुंडीत वांगी, टोमॅटो, मिरची सहज लावता येतात. पाल्यापाचोळय़ापासून तुम्ही केलेली सेंद्रिय माती तयार असली तर ती वापरावी, नाहीतर आता अनेक गृहनिर्माण संस्था ओल्या कचऱ्यापासून माती बनवतात व विकतात. ती माती विकत आणू शकता. दोन घमेली माती, अर्धे घमेले कोकोपीथ, पाव किलो नीमपेंड एकत्र करून कुंडी भरून घ्यावी.

भाजीपाल्याच्या रोपांसाठी शहराबाहेरच्या नर्सरीला भेट द्यावी लागेल. शेतकऱ्यांसाठीच्या या नर्सरीमध्ये सर्व भाज्यांची रोपे मिळतात. काळय़ा प्लास्टिक ट्रेमध्ये घालून रोपे देतात. मित्रमैत्रिणींचा गट करून एकदम तीस-चाळीस रोपे आणून वाटून घेता येतात. प्रत्येक भाजीची आठ-दहा रोपे घ्यावीत, जेणेकरून एखादे जगले नाही तरी चार-पाच रोपे राहतात.

वांग्यामध्ये काटेरी वांगी, कापाची लांब वांगी, भरताची मोठी वांगी असे प्रकार मिळतात. आपल्या आवडीनुसार दोन-चार रोपे निवडावीत. कुंडीत छोटा खळगा करून थोडी नीमपेंड भुरभुरून, आणलेली रोपे लावून लगेच पाणी द्यावे. पुढील महिनाभर या रोपांना आठवडय़ातून एकदा राखेचे रिंगण करावे अन्यथा आजूबाजूला राख भुरभुरावी. जेणेकरून या छोटय़ा रोपांचे किडीपासून रक्षण होते. दीड महिन्याने जांभळय़ा रंगाची फुले येऊन वांगी यायला सुरुवात होते. एखादं वांगं आल्यास एक वांगं व भरपूर वांगी आल्यावर भरीत, भरलं वांगं, सांडगे वांगी, भाजीसाठी ताजी वांगी मिळतात.

टोमॅटोची रोपे लावल्यावर त्यांना आधार द्यावा लागतो. कारण त्याच्या फांद्या फार नाजूक असतात व टोमॅटो आल्यावर त्यांच्या वजनाचा भार पेलू शकत नाहीत. वेताच्या काठय़ा व वायरने टोमॅटो बांधावेत नाहीतर ग्रीलला बांधावेत. बांधल्यामुळे रोपाची वाढ छान होते व भरपूर पीक मिळते. केवळ पालापाचोळय़ाच्या मातीमध्ये एक झाड आठ-दहा किलो टोमॅटो देते. टोमॅटोच्या झाडांवर कीड पडण्याचा धोका असतो. पण सशक्त व सजीव माती असली तर हा धोका कमी होतो. झेंडू, पुदिना व लसूण, टोमॅटोजवळ लावल्यास किडीचा धोका कमी होतो.

वेलीसारखी वाढणारे, द्राक्षाच्या घोसासारखे छोटे लालबुंद टोमॅटो देणारे चेरी टोमॅटोचे रोप तसे झपाटय़ाने वाढणारे, चिवट प्रकृतीचे झाड आहे. हे चेरी टोमॅटो मुलांना जाता-येता मटकावता येतात. सांबार, रश्श्यामध्ये घातल्यास सुंदर रंग येतो. लेटय़ूसची पाने व चेरी टोमॅटोचे सॅलडही छान होते. हे टोमॅटो दोन-तीन आठवडे छान टिकतात. चेरी टोमॅटोची रोपे बीपासून सहज तयार होतात. मातीत दोन-चार टोमॅटो टाकले तरी खूप रोपे मिळतात.

मिरचीची रोपे बीपासून करता येतात अथवा विकत आणता येतात. रंगाच्या जुन्या डब्यात, बादलीत, कुंडीत अथवा आडव्या क्रेटमध्ये ही मिरची छान येते. जेवढा सूर्यप्रकाश जास्त तेवढय़ा मिरच्या जास्त येतात. फारशी देखभाल न करता दोन-चार मिरच्या रोज मिळतात. सामयिक गच्चीवर प्रत्येकाने दोन-दोन क्रेटमध्ये मिरचीची रोपे लावली तर रोजची गरज सहज भागेल.

भाजीपाल्याच्या रोपांना फुले आल्यानंतर प्रत्येक झाडास एखादा किलो सेंद्रिय माती व मूठभर नीमपेंड घालावी. घरातील ओला कचरा मूठ मूठ घातला तरी चालेल. कीड येऊ नये म्हणून अर्धा लीटर पाण्यात दोन बूच नीमतेल आदल्या रात्री घालून हलवून ठेवावे. दुसऱ्या दिवशी फवारताना त्यात पाव चमचा निरमा पावडर घालून, हलवून झाडांवर फवारावे.

या झाडांचे जीवनमान साधारण चार-पाच महिने असते. नंतर कमी फलधारणा होते. फळांचा आकार कमी होतो. झाडं सुकतात व रोगांना आमंत्रित करतात (रोगांना बळी पडतात). अशा वेळी झाड उपटून कात्रीने कापून पुन्हा कंपोस्ट करण्यासाठी वापरावीत. झाडे वाफ्यात लावली असल्यास पुढच्या वेळी त्यात वेगळी भाजी (फेरबदल करावा) लावावी.

बागकामाची सुरुवात शोभेची झाडं लावून केली तरी जसे पारंगत व्हाल तसे भाजीपाला लावण्याकडे वळा. मग त्यातही सहजता येईल. आपल्या श्रमाची, रसायनविरहित ताजी भाजी मिळणे ही फार मोठी जमेची बाजू आहे. हा आनंद तुम्ही मैत्रिणींना वाटू शकतात. त्यांना सांगू शकता. टोमॅटोचं झाड टोमॅटोनं लगडलंय अन् वांग्याला वेड लागलंय.

मी भेटलेल्या आजींना ऐंशीव्या वर्षीही या वेडानंच झपाटलंय!