25 November 2017

News Flash

टोमॅटोचे कडाडलेले भाव कायम

किरकोळ बाजारात टोमॅटोचा भाव प्रतिकिलो शंभर रुपयांपर्यंत पोहोचला होता.

प्रतिनिधी, पुणे | Updated: July 17, 2017 2:16 AM

गेल्या आठवडय़ात किरकोळ बाजारात टोमॅटोचा भाव प्रतिकिलो शंभर रुपयांपर्यंत पोहोचला होता

पालेभाज्यांच्या दरात घट

गेल्या आठवडय़ात किरकोळ बाजारात टोमॅटोचा भाव प्रतिकिलो शंभर रुपयांपर्यंत पोहोचला होता. टॉमेटोचे कडाडलेले भाव कायम आहेत. घाऊक बाजारात टॉमेटोसह ढोबळी मिरची, शेवग्याचे दर वाढले असून अन्य फळभाज्यांचे दर स्थिर आहेत. पालेभाज्यांचे भाव कमी झाले आहेत. पावसाने हजेरी लावल्यानंतर फळभाज्यांची आवक वाढली आहे.

गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी राज्य तसेच परराज्यातून मिळून फळभाज्यांचे १७० ते १८० ट्रक आवक झाली. कर्नाटकातून दीडशे ते दोनशे पोती मटारची आवक झाली. कर्नाटक, गुजरातमधून दहा ते बारा ट्रक कोबी, इंदुरहून सात ते आठ टेम्पो गाजर, कर्नाटकातून दहा ते बारा टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश, तामिळनाडूतून पाच ते सहा टेम्पो शेवगा, कर्नाटकातून दोन टेम्पो शेवगा अशी आवक घाऊक बाजारात झाली. राज्याच्या वेगवेगळय़ा भागातून फळभाज्यांची आवक झाली आहे. यामध्ये सातारी आले चौदाशे ते पंधराशे पोती, फ्लॉवर अठरा ते वीस टेम्पो, कोबी आठ ते दहा टेम्पो, टॉमेटो अडीच ते तीन हजार पेटी, भुईमूग शेंग दोनशे पोती, ढोबळी मिरची आठ ते दहा टेम्पो, वाशी येथील बाजारातून दोन ते तीन टेम्पोमधून गाजर, तोंडली, डांगरची आवक झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख विक्रेते विलास भुजबळ यांनी दिली.

कांदा सत्तर ते ऐंशी ट्रक, इंदुर, आग्रा, गुजरातमधून तीस ते चाळीस ट्रक बटाटा, मध्य प्रदेश, गुजरातमधून पाच ते साडेपाच हजार पोती लसूण अशी आवक झाली.

पालेभाज्यांच्या दरात घट

घाऊक बाजारात मेथीच्या एक लाख जुडी, कोथिंबिरीच्या दीड लाख जुडी, शेपू पंचवीस ते तीस हजार जुडींची आवक झाली. पालेभाज्यांची आवक वाढली असून दरात घट झाली आहे. घाऊक बाजारात पालेभाज्यांचे शेकडय़ातील दर पुढीलप्रमाणे- कोथिंबीर- ३०० ते १०००, मेथी- ४०० ते ८००, शेपू- ५०० ते ७००, कांदापात- ५०० ते १०००, चाकवत- ५०० ते ६००, करडई- ४०० ते ५००, पुदिना- ३०० ते ४००, अंबाडी- ५०० ते ६००, मुळा- १२०० ते १५००, राजगिरा- ४०० ते ५००, चुका- ७०० ते ८००, चवळई- ५०० ते ६००, पालक- ४०० ते ६००

सीताफळांची आवक वाढली

फळबाजारात पेरू आणि सीताफळांची आवक वाढली असून मागणी चांगली आहे. त्यामुळे दोन्ही फळांच्या दरात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. लंगडा, दशहरा, चौसा या जातीच्या आंब्याची आवक वाढली आहे. गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत लिंबांची आवक वाढली असून लिंबांचे दर उतरले आहेत. फळबाजारात केरळहून सहा ट्रक अननस, मोसंबी तीस टन, संत्रा दोन टन, डाळिंब साठ ते सत्तर टन, पपई दहा ते बारा टेम्पो, चिकूशंभर खोकी, आंबा अडीच हजार पेटी, प्लम, पीच आणि पीअर दीड ते दोन हजार पेटी, पेरू तीनशे ते साडेतीनशे पाटी, कलिंगड आठ ते दहा टेम्पो, खरबूज दहा ते तीस टेम्पो, सीताफळ दोन ते अडीच टन, लिंबे सात ते आठ हजार गोणी अशी आवक झाली.

पुरंदर भागातून मटारची आवक सुरू

गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक मटारची आवक थांबली होती, त्यामुळे हिमाचल प्रदेशातून मटारची आवक बाजारात होत होती. घाऊक बाजारात रविवारी पुरंदर, पारनेर, वाई, सातारा येथून दोनशे पोती मटार तसेच कर्नाटकातून दीडशे ते दोनशे पोती मटारची आवक झाली. घाऊक बाजारात स्थानिक तसेच परराज्यातील मटारला दहा किलोमागे पाचशे ते सहाशे रुपये असा भाव मिळाला. गेल्या आठवडय़ात दहा किलो मटारचा भाव एक हजार ते बाराशे रुपयांपर्यंत होता.

First Published on July 17, 2017 2:12 am

Web Title: tomato continue to rule high in pune wholesale market