आणखी पंधरा दिवस भाव कमी न होण्याची चिन्हे

उन्हाचा तडाखा, पावसाने दिलेली ओढ असे प्रतिकूल वातावरण आणि पिकावर पडलेल्या किडीमुळे टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे टोमॅटोची आवक कमी झाली असून, टोमॅटोच्या भावाने शंभरी पार केली आहे. टोमॅटोचे कडाडलेले भाव आणखी पंधरा दिवस कमी होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे स्वयंपाकघरात टोमॅटोचा वापर करताना गृहिणींना हात आखडता घ्यावा लागणार आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून टोमॅटोच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. एरवी टॉमेटोचा भाव तीस ते चाळीस रुपये किलो असा असतो. गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे भाव सातत्याने वाढत असून, एक किलो टोमॅटोची किरकोळ बाजारात शंभर ते एकशेवीस रुपये किलो या भावाने विक्री केली जात आहे. टोमॅटोचे भाव कडाडल्यामुळे गृहिणी मेटाकुटीला आल्या आहेत. आणखी पंधरा दिवस टोमॅटोचे भाव कमी होण्याची चिन्हे नाहीत, असे बाजार आवारातून सांगण्यात आले. टोमॅटोच्या भाववाढीमागचे नेमके कारण काय? हे सामान्यांना देखील माहीत नाही.

या बाबत गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील प्रमुख विक्रेते विलास भुजबळ म्हणाले, की प्रतिकूल वातावरणामुळे टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी उन्हाचा तडाखा टोमॅटोच्या पिकाला बसला होता. पावसाने ओढ दिल्यामुळे टोमॅटोला पुरेसे पाणी मिळाले नाही. काही भागांत टोमॅटोवर कीड पडली, त्यामुळे टोमॅटोचे उत्पादन घटले. चांगल्या प्रतीच्या टोमॅटोला परराज्यातून मोठी मागणी आली. टोमॅटोचे उत्पादन पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर भागांत घेतले जाते. या भागातून होणारी आवक कमी झाल्याने चांगल्या प्रतीच्या टोमॅटोच्या दरात वाढ झाली.

किरकोळ बाजारातील विक्रेते प्रकाश ढमढेरे म्हणाले, की पुणे जिल्हय़ातील नारायणगाव, खेड, मंचर या भागांत टोमॅटोचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. मध्यंतरी टोमॅटोची गुजरात भागातील व्यापाऱ्यांनी पुणे जिल्हय़ातून मोठय़ा प्रमाणावर खरेदी केली. चांगल्या प्रतीचा माल बाजारात विक्रीसाठी उपलब्ध नसल्याने टोमॅटोच्या भावात सातत्याने वाढ होत गेली. चांगल्या प्रतीच्या टोमॅटोची प्रतिकि लो सत्तर ते शंभर रुपये या दराने विक्री केली जात आहे.

दुय्यम प्रतीचा टोमॅटो पन्नास रुपये किलो

पावसामुळे टोमॅटो खराब होण्याचे प्रमाण जास्त आहे. साधारणपणे एका केट्रमध्ये (प्लास्टिक जाळी) वीस ते बावीस किलो टोमॅटो बसतात. शेतातून केट्रमधून भरलेले टोमॅटो विक्रीसाठी पाठवले जातात. क्रेटच्या वरच्या बाजूस ठेवलेला टोमॅटो पावसामुळे खराब होतो. पावसामुळे एका केट्रमध्ये दहा किलो टोमॅटो खराब होतात. दुय्यम प्रतीचा टोमॅटो मंगळवारी मोठय़ा प्रमाणावर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला होता. दुय्यम प्रतीच्या टोमॅटोची विक्री पन्नास रुपये किलो दराने केली जात आहे, मात्र चांगल्या प्रतीच्या मालाचे भाव सत्तर ते शंभर रुपयांपर्यंत राहणार असून, आणखी पंधरा दिवस टोमॅटोचे भाव सामान्यांच्या आवाक्यात येण्याची शक्यता नाही, असे प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले.