अतिरिक्त उत्पादनामुळे दर कोसळले; घाऊक बाजारात ३० टक्क्यांनी घट, सोलापूर, सातारा, संगमनेर, कराड, नाशिक भागांतून आवक जास्त

वर्षभरापूर्वी ९० ते १०० रुपये प्रतिकिलो असा भाव खाणाऱ्या टोमॅटोची लागवड शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर केली. परिणामी आजमितीला टोमॅटोची आवक भरपूर होत असल्याने टोमॅटोला अपेक्षेएवढा दर मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. किरकोळ बाजारात टोमॅटोला प्रतवारीनुसार ७ ते १० रुपये किलो असा दर मिळत आहे.

टोमॅटोचे उत्पादन वाढल्याने दरात घसरण झाली आहे. आवक भरपूर पण मागणी कमी असल्याने टोमॅटोला दर मिळत नाहीत. गेल्या वर्षी टोमॅटोचे उत्पादन कमी झाल्याने बाजारात मोठी टंचाई निर्माण झाली होती. त्या वेळी टोमॅटोला ८० ते १०० रुपये असा दर मिळाल्याने टोमॅटो उत्पादक सुखावले होते. त्या वेळी पुणे विभाग तसेच नाशिक विभागात टोमॅटोची लागवड मोठय़ा प्रमाणावर करण्यात आली होती. टोमॅटोचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर झाल्याने बाजारात आवक मोठय़ा प्रमाणावर होत आहे. त्या तुलनेत मागणी नसल्याने टोमॅटोला अपेक्षेएवढा दर मिळत नसल्याचे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील प्रमुख विक्रेते विलास भुजबळ यांनी दिली.

टोमॅटोच्या दरात घाऊक बाजारात सुमारे तीस टक्क्यांनी घट झाली आहे. पुणे जिल्हा तसेच सोलापूर, सातारा, संगमनेर, कराड, नाशिक भागातून टोमॅटोची आवक होत आहे. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात दररोज सुमारे साडेतीन ते चार हजार पेटी टोमॅटोची आवक होत आहे. मार्केट यार्डातून उपनगर, जिल्हा तसेच कोकण विभागातील किरकोळ विक्रेते माल खरेदी करतात. पुणे शहर परिसरात लगतच्या गावांमधून टोमॅटो विक्रीसाठी पाठविला जात आहे. त्यामुळे टोमॅटोचे दर उतरले आहेत. साधारणपणे महिन्याभरापूर्वी टोमॅटोची दहा रुपये किलो दराने विक्री होत होती. येत्या काही दिवसांत टोमॅटोला फार दर मिळणार नाहीत. सध्या टोमॅटोला प्रतवारीनुसार किरकोळ बाजारात ७ ते १० रुपये किलो या दराने विकले जात असल्याचे ते म्हणाले.

दोन एकरांवर टोमॅटोची लागवड केली आहे. प्रतिएकर सुमारे तीस ते चाळीस टन उत्पादन मिळते. मार्केट यार्डात दररोज ८० ते १०० क्रेट (प्लास्टिक जाळी) टोमॅटो विक्रीसाठी पाठवित आहे. मजुरी, तोडणी, हमाली आणि वाहतूक खर्च मिळणे अवघड होत चालले आहे. त्यात टोमॅटोचे दर सातत्याने कमी होत असल्याने टोमॅटो लागवडीतून नफ्यापेक्षा नुकसान जास्त होत आहे.

– अमोल जाधव, शेतकरी, गणेगाव, शिक्रापूर, जि. पुणे