स्थानिक संस्था करासाठी (लोकल बॉडी टॅक्स- एलबीटी) महापालिकेकडून नोंदणी करूनही गेल्या आठ महिन्यांत एक रुपयाही एलबीटी न भरलेल्या टॉमी हिलफिगर यांच्या पुण्यातील चारही दुकानांमध्ये बुधवारी कारवाई करण्यात आली. या दुकानांमध्ये आतापर्यंत पाच कोटींचा एलबीटी चुकवलेला माल आढळून आला आहे. एलबीटी लागू झाल्यापासून आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे.
सहआयुक्त आणि स्थानिक संस्था कर प्रमुख विलास कानडे यांनी बुधवारी ही माहिती दिली. अद्याप एक रुपयाही एलबीटी न भरणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध महापालिकेने कारवाई सुरू केली असून बुधवारी सॅफरॉन लाईफस्टाईल ट्रेडर्स प्रा. लि. अंतर्गत टॉमी हिलफिगर यांच्या पुण्यातील चारही दुकानांवर एकाच वेळी कारवाई सुरू करण्यात आली. तयार कपडे, लहान मुलांचे कपडे, घडय़ाळे वगैरे माल या दुकानांमधून विकला जातो. तपासणी सुरू असताना पाच कोटींपेक्षा जास्त रकमेच्या मालाची आयात झाल्याचे दिसून आले असून या मालावर एक रुपयाही एलबीटी भरण्यात आलेला नाही.
टॉमी हिलफिगर टॉमी किड्स (फिनिक्स मार्केट सिटी मॉल, विमाननगर नगर रस्ता), टॉमी किड्स (फिनिक्स मार्केट, विमाननगर), कोरेगाव पार्क, नॉर्थ मेन रस्ता आणि संभाजी उद्यानासमोर या चार ठिकाणी तपासणी सुरू असून ही चारही दुकाने सील करण्यात आली आहेत. जो माल आतापर्यंत आढळून आला आहे त्यापोटी १५ लाख रुपये एलबीटी भरणे अपेक्षित होते. संबंधितांना एलबीटी विभागाच्या निरीक्षकांनी अनेकदा समक्ष सूचना देऊनही एलबीटी भरण्यात आला नाही, असे कानडे यांनी सांगितले.