आíथक वर्ष संपण्यास अवघे दोन महिने राहिले असतानाही महापालिकेच्या अंदाजपत्रकातील बहुतांश योजना अंदाजपत्रकाच्या पुस्तकातच राहिल्या आहेत. शहरातील मलापाणी शुद्धीकरण केंद्रांची उभारणी, चांदणी चौकात बहुमजली उड्डाणपूल, भामाआसखेड येथून पाणी पुरवठा, शहरात वाय-मॅक्स सुविधा देणे या आणि अशा अनेक योजनांची घोषणा करण्यात आली होती. मात्र अंदाजपत्रकातील बहुतांश योजनांची सुरुवातही झालेली नाही.
महापालिकेने सन २०१५-१६ या आíथक वर्षांसाठी चार हजार ४७९ कोटींच्या अंदाजपत्रकाला मान्यात दिली होती. स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष बापुराव कर्णे गुरुजी यांनी आयुक्तांच्या अंदाजपत्रकापेक्षा स्थायी समितीचे अंदाजपत्रक ५४१ कोटींनी वाढवले होते. याच अंदाजपत्रकातून १० टक्के करवाढ करण्यात आली होती. या अंदाजपत्रकात अनेक योजनांची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यातील बहुतांश योजना कागदावरच राहिल्या आहेत. त्यामुळे दरवर्षी प्रमाणेच यंदाच्याही अंदाजपत्रकाचे चित्र समोर आले आहे. अंदाजपत्रक वास्तवदर्शी न करता ते केवळ घोषणांसाठीच केले जात असल्यामुळे चालू वर्षीच्या अंदाजपत्रकातील बहुतांश कामे सुरू झाली नसल्याचे चित्र आहे.
चालू आर्थिक वर्षांत भामा आसखेड पाणीपुरवठा योजना आणि मलनिस्सारणसाठी केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानातून ११ मलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार होती. तसेच चांदणी चौकात बहुमजली उडडाणपूल बांधण्याच्या कामाचाही समावेश या अंदाजपत्रकात होता. नसíगक उंचसखलपणामुळे बाह्य़वळण मार्गावर असलेले तीव्र स्वरुपाचे चढ-उतार तसेच या भागातील मोठी वाहतूक या परिस्थतीचा विचार करून वाहतूक आराखडा तयार करण्यात आला होता. त्या आराखडय़ानुसार चांदणी चौकात दुमजली उड्डाणपूलाचे नियोजन करण्यात आले होते. या पुलासाठी २५० कोटींचा खर्च अपेक्षित असून अंदाजपत्रकात या पुलासाठी तरतूदही करण्यात आली आहे. मात्र या पुलाच्या कामाबाबत प्रगती झालेली नाही.
माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशातील सर्वाधिक मनुष्यबळ पुण्यात आहे. शहराच्या सर्व भागांमध्ये माहिती तंत्रज्ञान उद्योगांच्या कंपन्या आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन वाय-फाय तंत्रज्ञानाचा वाय-मॅक्स हा पुढील टप्पा संपूर्ण शहरामध्ये कार्यान्वित करण्यात येणार होता. अंदाजपत्रकात त्यासाठी तरतूदही करण्यात आली आहे. मात्र या योजनेचीही काही प्रगती झालेली नाही. शहरातील प्रमुख ५७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम काँक्रीट ओव्हरले पद्धतीने करण्यासाठी अंदाजपत्रकात १४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र अनेक रस्त्यांचे काम अपूर्ण आहे. महापालिका आयुक्त कुणाल कुमार नव्या आर्थिक वर्षांसाठीचे (सन २०१६-१७) अंदाजपत्रक २५ जानेवारी रोजी स्थायी समितीला सादर करणार आहेत.