‘विद्येबरोबरच नोकरीचेही माहेरघर’ म्हणून निर्माण झालेली ओळख सिद्ध करत पुण्याने या वर्षी नोक ऱ्यांच्या उपलब्धतेत दणदणीत वाढ दर्शवली आहे. नोकरी देणारे आणि नोकरी मागणारे यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या एका खासगी संकेतस्थळाने देशपातळीवर केलेल्या सर्वेक्षणात पुण्यातील नोक ऱ्यांच्या उपलब्धतेत गेल्या वर्षीच्या तुलनेत जानेवारीपासून चांगलीच वाढ झाल्याचे आपल्या आकडेवारीत म्हटले आहे.
‘नोकरी डॉट कॉम’ या संकेतस्थळाने देशातील प्रमुख शहरांमधील नोकरीच्या संधींविषयीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार पुण्यातील नोकरीच्या संधी डिसेंबर २०१३ च्या तुलनेत जानेवारी २०१४ पासून एप्रिलपर्यंत सातत्याने वाढल्या. तर एप्रिल २०१४ च्या तुलनेत मे २०१४ मध्ये नोक ऱ्यांची उपलब्धता कायम राहिली. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यांची तुलना करता दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद, चंढीगड, एर्नाकुलम, बडोदा, कोईमतूर आणि जयपूर या शहरातील नोकरीच्या संधी मात्र घटल्या आहेत.
कंपन्यांनी संकेतस्थळावर ‘पोस्ट’ केलेल्या तसेच ‘टेली कॉलिंग’ यंत्रणेद्वारे संकेतस्थळाला कळवलेल्या नोकरीच्या संधी जमेस धरून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. संकेतस्थळाने गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत पुणे नोकरीच्या संधींच्या दृष्टीने ‘स्थिर’ राहिल्याचे म्हटले आहे. पुण्याबरोबरच चेन्नई, हैद्राबाद, बंगळुरू आणि मुंबईतही नोकरीच्या संधींमध्ये वाढ झाली आहे. एप्रिलपेक्षा मे महिन्यात ११ टक्के वाढ नोंदवून चेन्नई नोकरीच्या संधींमध्ये आघाडीवर आहे. तर ८ टक्के वाढीसह हैद्राबाद द्वितीय क्रमांकावर आहे. बंगळुरू आणि मुंबईने अनुक्रमे ५ टक्के आणि २ टक्के वाढ नोंदवली आहे.
 
पुण्यातील नोकरीच्या संधींचा आलेख :

महिना        नोकरीच्या संधींची संकेतस्थळाने दिलेली आकडेवारी

नोव्हेंबर २०१३        १३७७
डिसेंबर २०१३        १३३०
जानेवारी २०१४        १५३४
फेब्रुवारी २०१४        १५७९
मार्च २०१४        १७१३
एप्रिल २०१४        १८५४
मे २०१४            १८४८

(संकेतस्थळाने २००८ मधील नोकरीच्या संधींसाठी सरसकट १००० असा आकडा गृहीत धरला आहे. त्यानंतरच्या प्रत्येक महिन्यातील नोकरीच्या संधी मोजून ही संख्या १००० च्या तुलनेत काढली आहे.)

 
गेल्या दोन महिन्यांत देशपातळीवर दिसलेल्या चित्रावरून विविध क्षेत्रांची तेजीमंदीही अहवालात नमूद करण्यात आली आहे.

नोक ऱ्या वाढलेली क्षेत्रे- माहिती तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित इतर सेवा, अभियांत्रिकी.
नोक ऱ्या घटलेली क्षेत्रे- विक्री आणि व्यापारवृद्धी, उत्पादन व देखभाल, लेखा व वित्तीय सेवा, मनुष्यबळ व आस्थापना, प्रकल्प व्यवस्थापन, विपणन व जाहिरात व्यवसाय, बँकिंग व विमा.