‘पुणे आणि शिक्षण’ हे जसे समीकरण आहे, तसेच ‘पुणे आणि नोकरी’ हेदेखील समीकरण म्हणून वेगाने उदयास येत आहे. नोकरीच्या संधींविषयी देशपातळीवर झालेल्या एका सर्वेक्षणात पुण्याने गेल्या वर्षभरात नोक ऱ्यांच्या संख्येत देशातील पहिल्या पाच शहरांमध्ये मुसंडी मारल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे इतर क्षेत्रांवर मंदीचे सावट असताना पुण्यात ही स्थिती आहे.
गेल्या वर्षी दिल्ली, बंगळुरू, मुंबई, चेन्नई आणि पुणे या पाच शहरांमधून एकूण ३० लाखांहून अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या. यात ८ लाख ६२ हजार नोकऱ्यांसह दिल्ली प्रथम क्रमांकावर राहिले तर पुण्यात ३ लाख ४२ हजार नोक ऱ्या उपलब्ध होऊन शहराचा या यादीत पाचव्या क्रमांकावर शिरकाव झाला.
गेल्या वर्षी औद्योगिक क्षेत्रात मंदी असूनही हे वर्ष तरुणांसाठी नोकरी मिळवण्याच्या दृष्टीने उत्तम राहिले. ‘करिझ्मा’ या करिअरविषयक संकेतस्थळाने केलेल्या एका सर्वेक्षणात २०१३ मध्ये आयटी, बीपीओ आणि बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांनी भविष्यातील व्यवसायविस्तारासाठी नोक ऱ्यांची दालने तरुणांना भरभरून खुली केली असल्याचे समोर आले आहे. यातही ‘मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह’, ‘सेल्स एक्झिक्युटिव्ह’ आणि ‘बिझिनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह’ या पदांसाठीच्या जागा सर्वाधिक असल्याचे दिसले. देशातील विविध जॉब पोर्टल्सवरून संकलित केलेल्या माहितीवरून हा निष्कर्ष काढण्यात आला.

‘फ्रेशर्स’ची झाली चांदी!
औद्योगिक मंदीच्या काळात महाविद्यालयातून नुकत्याच शिकून बाहेर पडलेल्या ‘फ्रे शर्स’ची मात्र चांदी झाली. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार नवी दिल्ली, बंगळुरू, मुंबई, चेन्नई आणि पुणे या पाचही शहरात जशी नोक ऱ्यांची उपलब्धता सर्वाधिक दिसली, तशीच ‘फ्रेशर्स’साठीच्या नोक ऱ्यांची संख्याही लक्षणीय होती. कनिष्ठ जागांसाठीच्या एकूण ३२ हजार नोकऱ्या या शहरांनी खुल्या केल्या. यात पुण्याने सुमारे ४ हजार नोक ऱ्या उपलब्ध करून दिल्या.-

 २०१४ मध्ये कोणत्या क्षेत्रांची चलती?
संकेतस्थळाचे संचालक सुधांशू अरोरा म्हणाले, ‘गेल्या वर्षीची आकडेवारी पाहता २०१४ मध्ये नोक ऱ्यांच्या संधी आणखी वाढतील अशी अपेक्षा आहे. या वर्षी बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रात नोकरीच्या अधिक संधी उपलब्ध होतील. माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या सेवा (आयटीइएस) ही क्षेत्रे या वर्षी स्थिर राहतील. मात्र या दोन क्षेत्रांत यंदा फारशा नोक ऱ्या उपलब्ध होणार नसल्याचा अंदाज आहे.’