माझी सत्ता होती तेव्हा खड्डे पडले होते; पण आता त्यापेक्षाही जास्त खड्डे पुण्यात पडले आहेत. तेव्हा तर निधी देखील कमी होता; पण आता भरपूर निधी असूनही खड्डे का पडत आहेत, असा प्रश्न विचारत खासदार सुरेश कलमाडी यांनी शनिवारी सत्ताधारी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला.
पुणे महापालिकेत कलमाडी यांच्या खासदार निधीतून पर्जन्यजल संधारण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असून त्याचे उद्घाटन कलमाडी यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. शहराध्यक्ष अभय छाजेड, विरोधी पक्षनेता अरविंद शिंदे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे, प्रदेश चिटणीस अजित आपटे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना कलमाडी म्हणाले की, खड्डय़ांचा प्रश्न पुण्यात खूप गंभीर बनला आहे. खरे म्हणजे त्या प्रश्नाबाबत आज मी आयुक्तांशी चर्चा करणार होतो; पण ते नसल्याने भेट होऊ शकली नाही.
माझ्यावेळीही खड्डे होते; पण सध्या जेवढे आहेत तेवढे नव्हते. त्या वेळी कामांसाठी निधी देखील फारच कमी होता. आता मात्र भरपूर निधी येत असूनही खड्डे का आहेत ते काही कळत नाही. पाऊस खूप झाला आहे ही वस्तुस्थिती असली, तरीदेखील खड्डय़ांचा प्रश्न सुटला पाहिजे. किमान प्रमुख रस्ते तरी खड्डे विरहितच असले पाहिजेत, असे प्रतिपादन कलमाडी यांनी या वेळी केले. निधी असूनही त्याचा वापर होत नाही, तसेच कामांची अंमलबजावणी जलदगतीने होत नाही, अशीही टिप्पणी त्यांनी केली.
चांगला पाऊस झाल्यामुळे आता शहराला दोन वेळा पाणी पुरवठा करायला काहीच हरकत नाही, असेही ते म्हणाले. पुणे मेट्रोचा प्रकल्प केंद्राकडून मार्गी लागण्यासाठी तो राज्याकडून लवकरात लवकर केंद्राकडे आला पाहिजे आणि त्यासाठी गेल्या आठवडय़ात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील यांच्याशी मी चर्चा केली होती, असेही कलमाडी यांनी सांगितले.
कार्यक्रमावर राजकीय बहिष्कार
महापालिकेत खासदार कलमाडी यांचा कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता होता. त्यापूर्वी अगदी थोडावेळपर्यंत महापौरांसह काही पक्षनेते व पदाधिकारी महापालिकेत एका बैठकीत उपस्थित होते. मात्र, कलमाडी यांच्या आगमनाची वेळ जवळ येताच सर्वानी महापालिका भवन सोडले. त्यामुळे कलमाडी यांच्या कार्यक्रमावर काँग्रेसवगळता अन्य सर्व पक्षांचा बहिष्कार असे चित्र पाहायला मिळाले. महापालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही या वेळी अनुपस्थित होते. विशेष म्हणजे कार्यक्रमानंतर काही पदाधिकारी पुन्हा महापालिका भवनात आले.