ज्येष्ठांसाठी सुरु केलेल्या हेल्पलाइनचे उद्घाटन
ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेला पोलिसांनी प्राधान्य दिले आहे. त्यांच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन निराकरण करण्याच्या सूचना शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी मंगळवारी दिली.
पुणे पोलिस आयुक्तालयातर्फे ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी हेल्पलाईन ( क्रमांक-१०९०) सुरु करण्यात आली आहे. या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी पोलीस आयुक्त शुक्ला बोलत होत्या. भारत संचार निगम महामंडळ (बीएसएनएल) महाव्यवस्थापक डॉ.के.पी होता, सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्त आयुक्त सी.एच. वाकडे या प्रसंगी उपस्थित होते.
पुणे शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षात ज्येष्ठांसाठी १०९० क्रमांक असलेली हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. ही सेवा आठवडय़ातील सातही दिवस ( २४- ७) सुरु राहणार आहे. ज्येष्ठांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तेथे नियंत्रण कक्षातील पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांची नावनोंदणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये सुरु करण्यात आली आहे. पोलिसांकडून त्यांना ओळखपत्र दिले जाणार आहे. ज्येष्ठांना काही सूचना करावयाच्या असतील तर त्यांनी हेल्पलाईन तसेच पुणे पोलिसांच्या फेसबुक व टिवट्र खात्यावर संपर्क साधावा,असे आवाहन शुक्ला यांनी केले.
पोलीस उपायुक्त पी.आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर ज्येष्ठ नागरिक कक्षाचे प्रमुख पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी सूत्रसंचालन केले.

पारपत्र पडताळणीसाठी पोलीस घरी
शहरात अनेक ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात. कामानिमित्त त्यांची मुले परदेशात स्थायिक झाली आहेत. पारपत्रासाठी पोलिसांकडून पडताळणी करण्यात येते. पडताळणीसाठी ज्येष्ठांना पोलीस ठाण्यात जावे लागते. त्यांना होणारा त्रास विचारात घेऊन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पारपत्रासाठी लागणाऱ्या पडताळणीसाठी ज्येष्ठांना पोलीस ठाण्यात बोलावू नये. पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने घरी जाऊन पडताळणी करावी, असे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे ज्येष्ठांना दिलासा मिळाला आहे.