ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या विरोधात ठेवीदारांच्या तक्रारी अद्याापही सुरूच आहेत. ८ मार्चपर्यंत त्यांच्या विरोधात ५ हजार १३८ ठेवीदारांनी, तर कर्ज प्रकरणामध्ये ५०० नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त नीलेश मोरे यांनी याबाबतची माहिती दिली.

नागरिकांकडून ठेवी तसेच कर्ज घेऊन त्यांची फसवणूक केल्या प्रकरणात डीएसके यांच्या विरोधात चार महिन्यांपासून तक्रारीचा ओघ कायम आहे. ८ मार्चपर्यंत तक्रार दाखल केलेल्या ठेवीदारांची संख्या लक्षात घेता आता फसवणुकीचा आकडा ३६७ कोटीपर्यंत गेला आहे. कर्ज घेतल्याच्या प्रकरणात आजवर पाचशेजणांनी तक्रारी दिल्या आहेत. त्यांच्याकडून एकूण ७७ कोटी ५७ लाख रुपयांचे कर्ज घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

डीएसके यांच्या पुणे, मुंबई शहरातील विविध कार्यालय आणि घरातून जप्त केलेल्या आर्थिक व्यवहारांचे कागदपत्रांद्वारे आर्थिक गुन्हे शाखेचे पथक सध्या तपास करीत आहे. डीएसके यांची २७६ बँक खाती गोठवली असून त्यामध्ये केवळ ११ कोटींची रक्कम असल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले. डीएसके यांच्या बांधकाम कंपन्या, शैक्षणिक संस्था आणि ट्रस्ट आदी ५९ संस्था आहेत. ठेवीदारांकडून तसेच विविध मार्गाने आलेला पैसा त्यांनी कोठे गुंतविला याबाबत आर्थिक व्यवहाराचा अभ्यास करण्यात येत आहे. या कामास दीड महिन्याचा कालावधी लागेल. त्यानंतर नेमकी किती मालमत्ता आहे, याचे चित्र स्पष्ट होईल असेही मोरे यांनी सांगितले.