मोठा गाजावाजा करत विद्यापीठाने दोन वर्षांपूर्वी वैमानिक प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केला. मात्र, उड्डाणापूर्वीच विद्यापीठाचे विमान जमिनीवर उतरले आहे. तीन वर्षांत या अभ्यासक्रमासाठी अवघे चार विद्यार्थी मिळाले आहेत. अभ्यासक्रमाचा प्रतिसाद वाढवण्यासाठी आता नवी मलमपट्टी कोणती करावी, असा प्रश्न विद्यापीठाला पडला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २०१३ मध्ये वैमानिक प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केला. एम.टेक एव्हिएशन असा अभ्यासक्रम सुरू करणारे भारतातील पहिलेच विद्यापीठ म्हणून स्वत:ची पाठही थोपटून घेतली. मात्र, विद्यापीठाचा या अभ्यासक्रमाचा प्रयोग फसलेलाच दिसत आहे. तीन वर्षांत या अभ्यासक्रमाला चारच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पहिल्या वर्षी जर्मनी येथील ‘एफएफएल’ या संस्थेबरोबर करार करून संस्थेने हा अभ्यासक्रम सुरू केला. दोन वर्षांच्या अभ्यासक्रमातील एक वर्ष भारतात आणि एक वर्ष जर्मनी येथे शिक्षण असे या अभ्यासक्रमाचे स्वरूप होते. या अभ्यासक्रमाचा पहिल्यावर्षी मोठा गाजावाजा झाला. वीस प्रवेश क्षमता असलेल्या या अभ्यासक्रमासाठी १३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. मात्र, या अभ्यासक्रमाचे एकूण शुल्क हे जवळपास ४० लाख रुपयांच्या घरात गेले. त्यातील चार लाख रुपये पुणे विद्यापीठाचे आणि उरलेले एफएफएलचे असे स्वरूप होते. मात्र, भरमसाट शुल्कामुळे विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे गेल्यावर्षी तुलनेने शुल्क कमी असणाऱ्या अमेरिकेतील डिन्स इन्टरनॅशनल संस्थेशी विद्यापीठाने करार केला आणि अखेरीस या संस्थेचे शुल्क भरू शकणारे तीन विद्यार्थी विद्यापीठाला मिळाले. अमेरिकेतील राहणे किंवा इतर खर्च वगळून या अभ्यासक्रमाचे शुल्क हे साधारण ३० लाख रुपयांच्या घरात आहे. पहिल्या वर्षीच अभ्यासक्रमाबाबत अनिश्चितता निर्माण झाल्यामुळे गेल्यावर्षी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश करण्यातच आले नाहीत. आता यावर्षी मात्र विद्यापीठाला पुन्हा या अभ्यासक्रमासाठी एक विद्यार्थिनी मिळाली आहे. शुल्काचे गणित चुकल्यामुळे तिन्ही वर्ष फसलेला या अभ्यासक्रमाच्या प्रयोगाला संजीवनी देण्याचे विद्यापीठाचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. मुळातच शुल्क जास्त असल्यामुळे एका विद्यार्थ्यांसाठीही विभागाकडून हा अभ्यासक्रम सुरू ठेवण्यात आला आहे.

प्लेसमेंटसाठी भारतीय कंपन्यांशी बोलणी
हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी सध्या भारतातील विमान कंपन्यांशी विद्यापीठाकडून बोलणी करण्यात येत आहेत. ‘एअर इंडिया,’ ‘गो एअर’ या कंपन्यांशी सध्या बोलणी सुरू आहेत, अशी माहिती विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. एस. आय. पाटील यांनी दिली. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला नोकरीची चांगली संधी मिळावी यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असल्याचे पाटील यांनी सांगितले.