नका नका मला
देऊ नका खाऊ
वैरी पावसानं
नेला माझा भाऊ
                   महापुरामध्ये
                   घरदार गेलं
                   जुल्मी पावसानं
                   दप्तरही नेलं
भांडीकुंडी माझी
खेळणी वाहिली
लाडकी बाहुली
जाताना पाहिली
                  हिंमत द्या थोडी
                  उसळू द्या रक्त
                  पैसाबिसा नको
                  दप्तर द्या फक्त…
भीमाशंकरजवळच्या माळीण गावातील प्रलयात सापडलेल्या शाळेला भेट दिली तेव्हा तिथे पडलेल्या अनेक वह्य़ांमधील एका वहीत ही कविता वाचायला मिळाली.. महापुरातही शिकण्याची उमेद, जगण्याची हिंमत अन् पावसाविषयीचा वैरभाव अधिक जिवंतपणानं प्रकट होताना या कवितेतून दिसतो.. सवंगडी काळानं ओढून नेल्यानंतरही ज्या भावना शब्दातून उलगडत जातात तेव्हा नकळत डोळे पाणावतात.. देवाघरी गेलेल्या माळीणमधील त्या फुलांसाठी..मराठीच्या पाठय़पुस्तकात असलेल्या या कवितेतली ही भावना या मुलांना कोवळ्या वयातच प्रत्यक्ष का अनुभवावी लागावी..
यंदाच्या पावसाळ्यात आपली सप्तरंगी स्वप्ने धो-धो पावसाने गावचा डोंगरबाबाच उद्ध्वस्त करील, असे माळीण या ४०-५० उंबऱ्यांच्या गावात कुणालाही वाटले नव्हते. पण निसर्गानेच त्या गावावर नांगर फिरवला व त्याचे अस्तित्वच पुसून टाकले. भीमाशंकरपासून साधारण ३० कि.मी. अंतरावर असलेल्या या गावात एरवी सगळे काही छान चालले होते. पण कोपलेल्या निसर्गापुढे कुणाचीच मात्रा चालली नाही. या गावातील मुलांचे भावजीवनही तसे या आजूबाजूच्या निसर्गाशी जोडले गेलेले.. पण त्यांचे प्राक्तनच निसर्गाने हिरावले.
माळीणच्या जिल्हा परिषद शाळेच्या वर्गात अजूनही तेथे शिकणाऱ्या मुलांच्या वह्य़ा पाहिल्या अन् त्या वह्य़ा पाहून डोळे पाणावल्यावाचून राहिले नाहीत. त्या वह्य़ांतील एका वहीतील  ‘हिंमत द्या थोडी’ ही कविता वाचायला मिळाली. ही कविता मुलांना मराठीच्या अभ्यासक्रमात आहे. ‘कृपा करून मला खायला नको. पण नेहमीचा मित्र असलेल्या पण आता शत्रू बनलेल्या पावसाने आमचं सर्व काही हिरावून नेलंय. माझं सगळं संचितच त्यात वाहून गेलं. माझं छोटसं पण हवहवंसं वाटणारं घर रोरावत आलेल्या पावसाने गिळून टाकलं. माझी लाडकी बाहुली वाहून गेली. माझ्या सगळ्या भावनांचा चक्काचूर करीत, खेळण्या-बागडण्याच्या दिवसात माझी सगळी खेळणीही निसर्गाचा हा प्रकोप घेऊन गेला. मला तुमचे धीराचे दोन शब्द हवेत, मला पुढे शिकायचंय. मला तुमचे पैसे नकोत, शाळेसाठी एक दफ्तर हवयं,’ असा या कवितेचा मथितार्थ. त्यातून एकीकडे घर वाहून गेलेले असताना त्याला फक्त मायेच्या हाताची गरज आहे. सगळं गमावूनही शेवटी शिकण्याची त्यांची ध्येयासक्ती कायम आहे. कवितेतले हे सारे वर्णन या मुलांच्या वाटय़ाला का यावे..?
या शाळेच्या इमारतीशिवाय चार घरं कशीबशी तग धरून माळीण गावांत उभी आहेत.. येथील प्रलयात १५० पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले. त्यात ३० मुले होती व त्यातही १९ मुले या शाळेतील होती. सविता दिलीप लेंभे या अकरा वर्षांच्या मुलीच्या नशिबी जगण नव्हतंच. तिचा मृतदेह सात भावंडं व आईच्या मृतदेहांसह बाहेर काढण्यात आला. तिची इंग्रजीची वही पाहिली. त्यात ‘माय स्कूल’, ‘माय पेट’, ‘माय टीचर’ हे निबंध तिने लिहिले आहेत. त्यात तिला गुरुजींनी १० पैकी ७ गुण दिले आहेत. तिच्या शाळेविषयी ती म्हणते, की आमच्या शाळेच्या सुरुवातीलाच एक बाग आहे, तिने आमच्या शाळेला शोभा आणली आहे. मुले मधल्या सुटीत या बागेत जाऊन गवतावर बसत..
या गावातील जिल्हा परिषदेची ही शाळा १९५० मध्ये सुरू झाली. तिथे पहिली ते सातवीच्या वर्गात ७२ मुले शिकत होती. तिथे इ-लर्निगही होते. ‘एम्पथी फाउंडेशन’च्या मदतीने हे इलेक्ट्रॉनिक शिक्षण मुलांना मिळत होतं. सवितानं शाळेपुढच्या ज्या बागेसारख्या भागाचे वर्णन केले आहे, तिथे आता रुग्णवाहिका उभ्या होत्या. शाळेची इमारत डोंगराच्या कडेला असल्यानं वाचली. डोंगर मात्र वाहून गेला. इतिहासाच्या वहीत उत्खनन म्हणजे काय, या प्रश्नाचे उत्तर सविता लिहिते.. ‘जेव्हा पूर, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तीत इमारती गाडल्या जातात, तेव्हा कालांतराने त्या तेथील जमीन खोदून बाहेर काढल्या जातात त्याला उत्खनन म्हणतात..’ दुर्दैवाने असे उत्खनन करण्याची वेळ तेथे येईल असे तिच्या मनातही नसेल. तिचा भाऊ संतोष लेंभे याच्या वह्य़ा पडलेल्या दिसल्या. त्यात १०० इंग्रजी शब्द व त्यांचे अर्थ लिहिले होते, त्यातलाच एक शब्द होता ‘लाइव्ह’ अन् पुढे लिहिलं होतं ‘जिवंत’. या शब्दाची अनुभूती इतक्या लवकर या गावाला वेगळ्या अर्थाने घ्यावी लागेल असे कुणाला वाटलेही नसेल.
पहिलीचा वर्ग पाहिला तर रंगीबेरंगी प्लास्टिकच्या बेंचेसनी शोभून दिसत होता. पण त्यातला जिवंतपणा हरपला होता. तेथे दोन वह्य़ा होत्या. त्यात लहान मुलांनी लिहिलेली पत्रे होती. सोहम झांजरे व नयना लेंभे या सहा वर्षांच्या मुलांनी लिहिलेली ही पत्रे. दोघेही या प्रलयात जग सोडून गेले ते कायमचेच. मयूर संजय पोटे व सुप्रिया गोरख पोटे या सहावीतील मुलांनी त्यांच्या या न जाण्याच्या वयात सोडवलेल्या गणितांनी आपण त्यांनाही नफ्या-तोटय़ाचे ज्ञान होते हे समजून जातो. शाळेच्या अनेक खोल्यात ग्रामपंचायतीच्या सदस्यांची नावे मुलांनी लिहिलेली होती, ती जशीच्या तशी होती.
आता या शाळेत मुले नव्हती, तर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी शाळेच्या खोल्या भरून गेल्या होत्या, त्यांच्या जेवणा-खाण्याच्या सोईसाठी तेथे तात्पुरते स्वयंपाकघरही उभे राहिले होते. पाचवीच्या शिक्षिका अनुराधा सुभाष यांनी सांगितले, की माझे तीन विद्यार्थी या प्रलयात वाहून गेले. दहा वर्षांची मानसी झांजरे, प्रसन्ना झांजरे व खेवलबाई शेळके अशी त्यांची नावे होती. २८ जुलैला मी त्यांना शेवटचे वर्गात पाहिले. दुसऱ्या दिवशी ईदची सुटी होती. त्याच वेळी माझी दुसऱ्या शाळेत बदली झाली होती. त्यामुळे या मुलांचा निरोप घेण्यासाठी खरेतर मी आले होते पण त्याआधीच त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला होता.

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
Vanchit Bahujan Aghadi Changes Lok Sabha Candidates in maharashtra ahead of lok sabha 2024 Election
‘वंचित’ चा फेरबदल कोणाच्या फायद्याचा? कोणाच्या सांगण्यावरून?
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार