पिंपरीतील ८९ व्या साहित्य संमेलनासाठी राज्यभरातून आलेल्या जवळपास २०० साहित्यप्रेमींना पिंपरी पालिकेने पिंपरी-चिंचवड दर्शन घडवले. त्यामुळे संमेलनाचा आनंद द्विगुणित झाल्याची भावना साहित्यप्रेमींनी व्यक्त केली. शहरातील विकास राज्यभरातील मान्यवरांपर्यंत पोहोचवण्यासाठी पालिकेने ही कल्पना राबवली. संमेलनाच्या उद्घाटन समारंभातही पालिकेने ‘मार्केटिंग’ करण्याची संधी सोडली नाही.
पिंपरीतील एचए कंपनीच्या मैदानावर १५ ते १८ जानेवारी दरम्यान मराठी साहित्य संमेलन झाले. या संमेलनात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील साहित्यिक, लेखक, साहित्यप्रेमी शहरात आले होते. या निमित्ताने शहरातील विकास, प्रशस्त रस्ते, प्रकल्प त्यांना दाखवावेत, या हेतूने पालिकेने ‘पिंपरी दर्शन’ ही कल्पना मांडली. त्यानुसार, या मंडळींना शहरातील शक्य तितके प्रकल्प दाखवण्याचा निर्णय झाला. त्यानुसार, तीन दिवसात सहा विविध खेपा मारून जवळपास २०० जणांना त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार शहर दर्शन घडवण्यात आले. बीआरटी रस्ते, सायन्स पार्क, भक्ती-शक्ती, दुर्गादेवी टेकडी आदी ठिकाणी त्यांना नेण्यात आले.
संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात पालिकेच्या विकासकामांवर आधारित लघुपट दाखवण्यात आला. शहरातील मोठे रस्ते, भव्य उड्डाणपूल, उद्याने, विविध प्रकल्प आदींची माहिती त्यात होती. साहित्य संमेलनासाठी पिंपरी महापालिकेने भरपूर सहकार्य केले. त्यामुळे संमेलनात हे सादरीकरण करण्यास आयोजक संस्थेने मान्यता दिली होती. याशिवाय पालिकेने संमेलनाच्या ठिकाणी दालन ठेवले होते. त्याद्वारे महापालिकेच्या विविध योजना व प्रकल्पांची माहिती नागरिकांना देण्यात येत होती.