भिगवणजवळील कुंभारगाव परिसरात उजनी धरणात ‘फ्लेिमगो’ (रोहित) या स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनास सुरूवात झाली आहे. पर्यटकांना या ठिकाणी घरगुती वातावरणात राहून पक्ष्यांचे दर्शन घेता यावे ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा’तर्फे (एमटीडीसी) सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पर्यटकांना खेडय़ातील जीवनाचा अनुभव घेता यावा आणि स्थानिकांना त्यातून रोजगार मिळावा यासाठी ‘एमटीडीसी’तर्फे ‘निवास व न्याहरी योजने’तून घरगुती व्यावसायिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याची परवानगी दिली जाते. या योजनेत कुंभारगावमधून फ्लेिमगो पर्यटनासाठी पहिलाच अर्ज आला असून आता पर्यटक या ठिकाणी फ्लेमिंगो दर्शनाचा आनंद लुटू शकणार आहेत. कुंभारगावमधील स्थानिक युवकांनी एकत्र येऊन येथे राहण्या- जेवणाच्या सोईबरोबरच नौकाविहाराचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.    
फ्लेमिंगो दर्शनाबरोबरच उजनीतील राहू, कटला या ताज्या माशांची मेजवानी आणि स्थानिक गोठय़ातील दुधा- तुपाचा आस्वादही येथे घेता येणार असल्याची माहिती ‘एमटीडीसी’च्या  प्रादेशिक अधिकारी वैशाली चव्हाण यांनी दिली. अधिक माहितीसाठी दत्तात्रय नगरे- ८०८७७६७६९१ किंवा नितीन डोळे- ९३२५५१०१९ या स्थानिक युवकांशी संपर्क साधावा, अशी माहितीही ‘एमटीडीसी’ने पुरवली आहे.