सुटय़ांच्या हंगामामुळे पक्षीनिरीक्षणासाठी येणाऱ्यांची गर्दी

विद्यार्थीवर्गाची उन्हाळय़ाची सुट्टी सुरू होताच, बाहेरगावी पर्यटनाला जाणाऱ्या ठाणे, नवी मुंबईकरांनी आता आपल्या शहरातील निसर्गसौंदर्याकडे मोर्चा वळवला आहे. स्थलांतरित पक्ष्यांना न्याहाळण्यासाठी अतिशय योग्य समजल्या जाणाऱ्या ठाणे तसेच नवी मुंबईतील खाडीकिनारी सध्या पर्यटकांची गर्दी होत असल्याचे दिसत आहे. हिवाळय़ाच्या काळात उत्तरेकडून मुंबई, ठाण्याच्या खाडीभागात स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचा हंगाम संपत आला असला तरी, खाडीकिनारी बाराही महिने दिसणारे आकर्षक पक्षी पाहण्याची ओढ पर्यटकांना आकर्षित करत आहे. त्यामुळेच साकेत उद्यान, ऐरोली खाडी किनारा, ठाणे-डोंबिवलीतील खाडीकिनारी आणि येऊरच्या जंगलाला पक्षीपर्यटनासाठी पसंती मिळत आहे.

साधारण ऑक्टोबर महिन्याच्या काळात उत्तरेतील तापमान घटू लागल्यानंतर तेथील पक्षी मुंबई, ठाण्याच्या खाडीकिनारी मुक्कामाला येतात. हे पक्षी पाहण्यासाठी त्या काळात खाडीकिनारी पर्यटकांची गर्दी होते. त्यातच महाराष्ट्र शासनाच्या कांदळवन विभागाने स्थानिक कोळय़ांना प्रशिक्षण देऊन खाडीसफरी भरवण्यास सुरुवात केली आहे. याचाही पर्यटकांना फायदा होत आहे. सध्या परदेशी पक्ष्यांच्या परतीचा काळ आहे. मात्र, स्थानिक पक्षी पाहण्यासाठी का होईना, निसर्गप्रेमी खाडीकिनारी जमू लागले आहेत. कोकिळांच्या प्रजाती, पावशा, इंडियन पिटा अशा पक्ष्यांसह विविधरंगी फुलपाखरेही पर्यटकांना पाहायला मिळत आहेत. येऊर, मानपाडा निसर्ग उद्यान, वाघबीळ ही पर्यटकांची आवडीची ठिकाणे आहेत. ठाणे खाडीव्यतिरिक्त साकेत मैदानाजवळ उभारण्यात आलेले स्व. उत्तमराव पाटील निसर्ग उद्यान, तसेच कळवा पूल या ठिकाणी सीगल पक्ष्यांना पाहण्यासाठी नागरिक या काळात गर्दी करतात. सीगल पक्ष्यांचा हा प्रजननाचा काळ असल्याने या प्रजनन काळात त्यांच्या डोक्याचा रंग बदलतो. मूळत: पांढऱ्या रंगाचे असणाऱ्या या पक्ष्यांच्या डोक्याचा भाग प्रजनन काळात काळा होतो. सीगल पक्ष्यांना अशा प्रकारे न्याहाळणे पक्षीप्रेमी, छायाचित्रकारांसाठी पर्वणी असते. साकेत मैदानाजवळील निसर्ग उद्यानातून खाडी परिसर पाहता येत असल्याने छायाचित्रकार या ठिकाणी पक्षी न्याहाळण्यासाठी जात असल्याचे पक्षीप्रेमी अविनाश भगत यांनी सांगितले. सुट्टीचा काळ जवळ येऊ लागल्याने विद्यार्थी तसेच पर्यावरणप्रेमींसाठी निसर्ग भ्रमंती आयोजित करणे यासारखे उपक्रम राबविले जात आहेत. पर्यावरण दक्षता मंडळातर्फे झाडांची ओळख व्हावी यासाठी बारा बंगला, ठाणे खाडी, दत्ताजी साळवी उद्यान, कचराळी तलाव या ठिकाणी निसर्ग भ्रमंती आयोजित करण्यात येत असतात, अशी माहिती देण्यात आली.