जिल्हाबंदी असताना गर्दी केल्याने कारवाईचा इशारा

लोणावळा : करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर जिल्ह्य़ातील सर्व पर्यटनस्थळे बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. पर्यटकांना पर्यटनस्थळांवर येण्यास मज्जाव केल्यानंतर मुळशी, मावळात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. जिल्हाबंदीचे आदेश धुडकावून पर्यटक गर्दी करत असल्याने प्रशासनाकडून कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या आठवडय़ात मुळशी, मावळात पुन्हा पाऊस सुरू झाल्यानंतर डोंगररांगांमधून धबधबे वाहू लागले आहेत. शनिवारी आणि रविवारी या भागात मुंबई-पुण्यातील पर्यटक गर्दी करत आहेत. टाळेबंदी मागे घेण्यात आल्यानंतर निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी जिल्हाबंदी कायम आहे. अन्य जिल्ह्य़ातून पुणे जिल्ह्य़ात प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. प्रवास परवाना असल्याशिवाय जिल्ह्य़ात प्रवेश देण्यात येत नाही. जिल्हाबंदीचे आदेश धुडाकावून गेल्या आठवडय़ापासून मुळशी, मावळ भागात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पर्यटकांमध्ये युवक-युवतींची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे. मुळशीतील ताम्हिणी घाट, पौड भाग तसेच लोणावळ्यातील सहारा पूल धबधबा, भुशी धरण, लायन्स पॉईंट, राजमाची गार्डन,भाजे धबधबा,पवना धरण, आंदर मावळ परिसरात सध्या गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. लोणावळा शहर, ग्रामीण भाग, कामशेत, वडगाव भागात नाकाबंदी करण्यात आली आहे. लोणावळा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे, वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर व पथकाने बंदोबस्त लावला आहे.

स्वातंत्र्यदिनी उच्चांकी गर्दी

दरवर्षी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पुणे-मुंबईतील पर्यटक लोणावळा, मावळ तसेच मुळशी परिसरात गर्दी  करतात. या भागात मुंबई तसेच पुण्यातील अनेक उद्योजकांचे बंगले आहेत. अनेकांचे फार्महाऊस आहेत. मावळ तालुक्यात करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर या भागात होणारी पर्यटकांची गर्दी प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरली आहे. पोलिसांनी जरी या भागात बंदोबस्त नेमला असला तरी जिल्हाबंदीच्या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

लोणावळा, खंडाळा तसेच मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळे बंद करण्यात आली आहेत. मावळ तालुक्यात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. आदेश धुडकावणाऱ्या पर्यटकांविरोधात रितसर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. स्वातंत्र्यदिनी लोणावळा परिसरात होणारी गर्दी टाळण्यासाठी बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

– मनोजकुमार यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणावळा शहर पोलीस ठाणे</strong>