सुरक्षेच्या नियमांचे पालन करून दीड महिन्यांत ६० हजार जणांची भेट

पुणे : करोना प्रादुर्भावाच्या दहा महिन्यांनंतर खुल्या झालेल्या जिल्ह्यातील पर्यटन स्थळांमध्ये शनिवारवाड्याला पर्यटकांची पसंती लाभली आहे. करोनाविषयक सुरक्षेच्या नियमांचे पालन करून दीड महिन्यांत ६० हजार जणांनी शनिवारवाड्याला भेट दिली आहे. त्यानंतर कार्ला लेणी या स्थळाने दुसरे स्थान पटकाविले आहे.

करोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमध्ये गर्दी टाळण्याच्या उद्देशातून राज्यातील प्रेक्षणीय स्थळे गेल्या वर्षी १६ मार्चपासून बंद ठेवण्यात आली होती. प्रेक्षणीय स्थळे सुरू करण्यासाठी परवानगी देताना पुरातत्त्व विभागाने संबंधित जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार ही स्थळे पर्यटकांसाठी खुली करावीत असे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रेक्षणीय स्थळे सुरू करण्याबाबत घेतलेल्या निर्णयानंतर जवळपास दहा महिन्यांनी जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे ६ जानेवारीपासून खुली करण्यात आली.  शनिवारवाडा येथे पर्यटकांसाठी ऑनलाइन तिकीट विक्रीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शनिवारवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी सॅनिटायझर स्टँड ठेवण्यात आला असून मुखपट्टी परिधान केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला आत प्रवेश दिला जात नाही.

शासन निर्णयानुसार सुरक्षेच्या नियमांचे पालन करून गेल्या दीड महिन्यांत ६० हजारांहून अधिक पर्यटकांनी शनिवारवाड्याला भेट दिली. शनिवार आणि रविवारी शनिवारवाड्याला भेट देणाऱ्यांची संख्या मोठी असते. शनिवारवाडा शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असल्याने पर्यटकांची पसंती असते. रात्र संचारबंदी लागू होण्यापूर्वीच्या शनिवार आणि रविवारी सात हजारांहून अधिक लोकांनी शनिवारवाडा पाहण्याची संधी साधली, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.