26 September 2020

News Flash

स्वातंत्र्यदिनी पर्यटकांनी लोणावळ्यात येऊ नये; पोलिसांचे आवाहन

पर्यटनासाठी गर्दी केल्यास कायदेशीर कारवाई होणार

लोणावळा : करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वातंत्र्यदिनी लोणावळ्यात पर्यटनासाठी येऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

१५ ऑगस्ट रोजी स्वांतत्र्यदिनाची सार्वजनिक सुट्टी असल्याने दरवर्षी पर्यटक मोठ्या प्रमाणावर लोणावळ्यात गर्दी करतात. मात्र, यंदा करोनाचं संकट असल्याने पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांना लोणावळ्यात येण्यास सुरुवातीपासूनच मनाई करण्यात आली आहे. मात्र, आता १५ ऑगस्ट रोजी कोणीही लोणावळ्यात येऊ नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. जर पोलिसांची नजर चुकवून याठिकाणी आलेलं कोणी आढळल्यास त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

याबाबत माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यादव म्हणाले, यावर्षी १५ ऑगस्ट शनिवारच्या दिवशी येत असून दुसऱ्या दिवशी रविवार आहे. त्यामुळे लागून सलग दोन दिवस सुट्ट्या असल्याने या दोन्ही दिवशी लोणावळ्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन लोणावळा पोलिसांनी हे आवाहन केले आहे.

लोणावळा परिसरात सध्या दमदार पाऊस सुरू आहे. परिसरातील धबधबे, धरण, नद्या, ओढे हे ओसंडून वाहत आहेत. येथील परिसर अगदी निसर्गरम्य झाला असून सर्वत्र हिरवळ दिसत आहे. दरवर्षी हेच निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी हजारो पर्यटक स्वातंत्र्य दिनी लोणावळा शहरात गर्दी करतात. परंतु, यावर्षी करोना महामारीचा अडसर असून जिल्हाधिकाऱ्यांनीही आदेशाद्वारे पर्यटकांना पर्यटनस्थळी येण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे लोणावळा पोलिसांनी देखील कंबर कसली आहे, अशी माहिती यादव यांनी दिली आहे.

पर्यटनस्थळी आलेल्या ३०० पेक्षा अधिक पर्यटकांवर गुन्हा दाखल

लोणावळा परिसरातील भुशी धरण ओसंडून वाहू लागल्यानंतर पर्यटकांचा ओघ लोणावळ्याच्या दिशेने सुरू झाला होता. यांपैकी, काही पर्यटक नियमांची पायमल्ली करत पर्यटनस्थळी दाखल झाले होते. अशा ३०० पेक्षा अधिक पर्यटकांवर लोणावळा पोलिसांनी कारवाई करीत खटले दाखल केले होते. त्यांना मावळ न्यायालयाने साडेतीन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

लोणावळा शहरात आणि मुख्य रस्त्यांवर पोलिसांची नजर

करोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी लोणावळा शहरात दाखल होऊ नये यासाठी खंडाळा, खालापूर टोल नाक्यासह नवसेना बाग, राईवूड चौकी याठिकाणी पोलीस तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. पर्यटक आढळल्यास संबंधित ठिकाणी थेट कारवाई केली जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2020 4:05 pm

Web Title: tourists should not come to lonavla on independence day appeals police otherwise strict action will be taken aau 85 kjp 91
टॅग Independence Day
Next Stories
1 पिंपरी-चिंचवडला पाणी पुरवठा करणारे पवना धरण भरले ५६.१९ टक्के
2 ई- पासचा गांजा विक्रीसाठी उपयोग; आरोपीला पिंपरीमध्ये अटक
3 पुणेकरांची चिंता मिटली; खडकवासला धरण १०० टक्के भरले
Just Now!
X