वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्यांना वाहनचालकांवर कारवाई

वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी हायड्रोलिक क्रेनचा वापर करून कारवाई करण्यास सुरुवात केल्याने वाहने ओढून नेण्याच्या शुल्कात (टोईंग चार्ज) दुपटीने वाढ झाली असून टोईंग चार्जसह आता वाहनचालकांकडून वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारण्यात येत आहे. शुल्क वाढ तसेच जीएसटीच्या आकारणीमुळे बेशिस्त वाहनचालकांना आणखी भरुदड  सोसावा लागणार आहे.

शहरात दुचाकी आणि चारचाकी वाहने लावण्यास जागा उपलब्ध नसल्याने सम-विषम दिनांक न पाहता वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने वाहने लावली जातात. बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडी होती आणि वाहतूक पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई केली जाते. दुचाकी क्रेनने उचलून नेल्या जातात तसेच मोटारी ओढून नेल्या जातात. यापूर्वी दुचाकी वाहने उचलून टेम्पोत ठेवली जात होती. मोटारी किंवा दुचाकींना जॅमर लावले जातात.

वाहतुकीला अडथळा ठरणारी तसेच वाहने लावण्यासाठी आखून दिलेल्या पट्टय़ाचा बाहेर वाहने लावणाऱ्या वाहनचालकांवर गेल्या पंधरा दिवसांपासून हायड्रोलिक क्रेनचा वापर करून कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. हायड्रोलिक क्रेनचा वापर सुरू झाल्यामुळे टेम्पोत ठेवल्या जाणाऱ्या दुचाकींची आदळआपट होण्याची शक्यता कमी असते. हायड्रोलिक क्रेनचा वापर सुरू झाल्यापासून बेशिस्तांकडून आकरण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ झाली असल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली.

वाहतूक पोलिसांकडे सहा हायड्रोलिक क्रेन दाखल झाल्या असून त्यापैकी पाच क्रेनचा वापर दुचाकी उचलण्यासाठी केला जात आहे. उर्वरित एका क्रेनचा वापर मोटारी ओढून नेण्यासाठी केला जात आहे. यापूर्वी दुचाकीवर कारवाई झाल्यास चालकाकडून दोनशे रुपये दंड तसेच पन्नास रुपये क्रेनचा खर्च आकारण्यात येत होता. आता हायड्रोलिक क्रेनद्वारे करण्यात येणाऱ्या कारवाईनंतर दुचाकी ओढून नेण्याचा खर्च दोनशे रुपये आकारण्यात येत आहे. क्रेन चालकाकडून देण्यात येणाऱ्या सेवेबद्दल १८ टक्के जीएसटी आकारण्यात येत असून दुचाकी चालकांना ४३६ रुपये मोजावे लागणार आहेत. मोटार तसेच चारचाकी वाहनांनासाठी दोनशे रुपये दंड, वाहन ओढून नेण्याचा खर्च चारशे रुपये आणि जीएसटी ७२ रुपये असा एकूण मिळून ६७२ रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

हायड्रोलिक क्रेनच्या सहाय्याने बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. सहा टोईंग व्हॅन वाहतूक पोलिसांना मिळाल्या आहेत. दंडाच्या रकमेत वाढ झालेली नाही. मात्र, वाहने ओढून नेण्यापोटी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ झाली असून त्यावर जीएसटी आकारण्यात येत आहे.    – पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग