‘जीएसटी’मधून जीवनावश्यक खाद्यान्न वस्तू वगळण्याची मागणी

वस्तू आणि सेवा करातून (गुडस् अ‍ॅन्ड सव्‍‌र्हिस टॅक्स- जीएसटी) जीवनावश्यक खाद्यान्न वस्तू वगळण्याच्या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी व्यापारी संघटनांनी गुरुवारी (१५ जून) लाक्षणिक राज्यव्यापी बंद पुकारला आहे. या बंदमध्ये पुण्यातील घाऊक बाजारपेठांचा सहभाग असून सर्व घाऊक बाजारपेठा गुरुवारी बंद राहणार आहेत.

जीवनावश्यक खाद्यान्न वस्तू (शेतीमाल) जीएसटी मुक्त असाव्यात, तसेच आटा, रवा, मैदा, बेसन, मिरची, हळद, चिंच, खजूर, मनुका, सुटा चहा आणि अन्य व्हॅटमुक्त असलेल्या वस्तूदेखील जीएसटीमुक्त असाव्यात, कर आकारणी करताना वस्तूंचे वर्गीकरण सोपे असावे, त्यात वेगवेगळ्या अटींनुसार वेगवेगळे कर असू नयेत आणि जीएसटीचे जाचक नियम व कायदे वगळावेत, अशा मागण्या शासनाकडे करण्यात आल्या आहेत. शासनाने व्यवसाय कर व बाजार समिती सेस रद्द करावा, जीएसटी लागू केल्यानंतर करदात्यांना कायद्यातील तरतुदींची पूर्ण माहिती होण्यासाठी अवधी मिळावा आणि त्या अवधीमध्ये कोणत्याही प्रकारचा दंड किंवा शिक्षा करण्यात येऊ नये, अशाही मागण्या करण्यात आल्या असून या मागण्यांसाठी बंद पुकारण्यात आल्याचे सांगण्यात आले.

पिंपरीतही लाक्षणिक बंद

अन्नधान्य पॅकिंग करुन विकल्यास त्याला ५ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याचा फटका हॉटेल व्यावसायिक, घाऊक व्यापारी आणि सामान्य नागरिकांना बसणार आहे. त्यामुळे या निर्णयाला विरोध करण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील घाऊक व्यापारी गुरुवारी एक दिवसाचा लाक्षणिक बंद करणार असल्याची माहिती फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष, माजी खासदार गजानन बाबर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ पिंपरी चिंचवडने घेतलेल्या पत्रकार परिषदेला असोसिएशनचे महासचिव गोविंद पानसरे, खजिनदार मधुकर गायकवाड, सदस्य श्याम मेघराजानी आणि सुरेशलाल खिंवसरा आदी उपस्थित होते. बाबर म्हणाले,की जीएसटीचे आम्ही स्वागत करतो, मात्र अन्नधान्याला चुकीच्या पद्धतीने जीएसटी लावला आहे. सुटे अन्नधान्य विक्री केले तर त्याला जीएसटी लागत नाही. मात्र, तेच अन्नधान्य पॅकिंग करुन विकले तर त्याला ५ टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. या निर्णयामुळे व्यावसायिकांना फटका बसणार आहे. पर्यायाने त्याचा भार सामान्य जनतेवर पडणार आहे. त्यामुळे या निर्णयाला संघटनेचा विरोध आहे. सरकारच्या दुटप्पी वागणुकीमुळे अन्नधान्य विक्रेत्या दुकानदारांकडून अन्नधान्य विक्रीमध्ये घोटाळे होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे पॅकिंग केलेल्या अन्नधान्यावर लावलेला जीएसटी रद्द करावा, या मागणीसाठी आज लाक्षणिक बंद पाळला जाणार आहे.