गेली ५० वर्षे शेतकऱ्यांची घोर फसवणूक होत आहे. शेतकऱ्यांचा माल विकून दलाल मोठे झाले. मात्र, शेतकरी अजूनही गरिबीत दिवस काढत असून आत्महत्या करत आहेत, अशी खंत अभिनेते सयाजी िशदे यांनी आकुर्डीत बोलताना व्यक्त केली.
माउली ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आकुर्डी गावात सुरू केलेल्या माउली जेनेरिक औषध दालनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, उद्योजक व्ही. एस. काळभोर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी पोलीस अधीक्षक विक्रम बोके, माजी नगरसेवक धनंजय काळभोर, दत्ता पवळे, ऊर्मिला काळभोर, डॉ. श्याम अहिरराव आदी उपस्थित होते. काळभोर परिवाराच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी एक लाखाचा धनादेश सयाजी िशदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
िशदे म्हणाले, शेतकरी मोठा झाला तर देश मोठा होणार आहे. शेतकरी जगला तर देश जगणार आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपला कणा ताठ ठेवावा. शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. दुष्काळ सरकारने आणलेला नाही. मग सरकारकडे कशाला काय मागायचे, यामुळेच मी सरकारी घर घेतले नाही, असे ते म्हणाले. प्रास्ताविक धनंजय काळभोर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार विजय बोत्रे यांनी मानले.