साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावरही सोमवारी (१३ मे) व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद कायम राहणार आहे. ‘स्थानिक संस्था करा’ तील (एलबीटी) जाचक अटी दूर करण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत बंदच्या आंदोलनामध्ये मंगळवारी (१४ मे) पदयात्रा काढण्यात येणार आहे.
‘एलबीटी’ चा तिढा सोडविण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक समिती नियुक्त केली आहे. यामध्ये लोकप्रतिनिधी आणि ग्राहक प्रतिनिधींचा समावेश करावा, अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, सचिव महेंद्र पितळीया आणि खजिनदार फत्तेचंद रांका उपस्थित होते. सरकारने नियुक्त केलेल्या समितीमध्ये केवळ अधिकारीच असतील तर, हा प्रश्न सुटणार नाही. कराच्या अंमलबजावणीमध्ये स्थानिक पातळीवर कोणत्या समस्या आहेत याची या अधिकाऱ्यांना जाण नाही. एलबीटी हा ग्राहकांकडून म्हणजेच जनतेकडून वसूल केला जाणार आहे. त्यामुळे या समितीमध्ये लोकप्रतिनिधी आणि ग्राहक प्रतिनिधींचाही समावेश केला तरच या समितीबरोबर चर्चा करण्यात अर्थ आहे, असेही ओस्तवाल यांनी स्पष्ट केले.
‘एलबीटी’ संदर्भात राष्ट्रवादी, भाजप-शिवसेना आणि मनसे या पक्षांनीही व्यापाऱ्यांना पाठिंबा दिल्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण एककी पडले आहेत, असा दावा फत्तेचंद रांका यांनी केला. त्याचप्रमाणे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे शहराध्यक्ष अॅड. एम. पी. ऊर्फ दादासाहेब बेंद्रे यांनीही व्यापाऱ्यांच्या भूमिकेला पाठिंबाच दर्शविला आहे. व्यापाऱ्यांची भूमिका ताठर नाही तर, ग्राहकांच्या प्रश्नासाठीच हा लढा आहे. जाचक अटी रद्द होत नाहीत तोपर्यंत ‘एलबीटी’ ऐवजी पुन्हा जकात लागू करण्यास आमची कोणतीही हरकत नाही. हा तिढा सोडविला जात नाही तोपर्यंत सराफी दुकाने उघडणार नाहीत.
सर्वोच्च न्यायालयाने व्यापाऱ्यांची याचिका फेटाळलेली नाही. तर, ‘एलबीटी’ संदर्भात चार महिन्यांत निर्णय करावा, असे निर्देश उच्च न्यायालयाला दिले आहेत, असे सूर्यकांत पाठक यांनी सांगितले. यामुळे कायद्याच्या स्थगितीसाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा असून एलबीटी कायद्यातील त्रुटी आणि व्यापाऱ्यांच्या अडचणीबाबत उच्च न्यायालयात भूमिका मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘एलबीटी’ चा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारला सद्बुद्धी मिळावी यासाठी शहरातील सर्व व्यापारी संघटना त्यांच्या परिसरात सोमवारी (१३ मे) सत्यनारायणाची पूजा करणार आहेत. तसेच, मंगळवारी (१४ मे) बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यान ते लक्ष्मी रस्ता, टिळक चौक, केळकर रस्त्याने बाबा भिडे पुलावरून नदीपात्रालगतच्या मैदानापर्यंत पदयात्रा काढण्यात येणार असल्याचे महेंद्र पितळीया यांनी सांगितले.
व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई करा
‘एलबीटी’ च्या प्रश्नावर बेमुदत बंद करून सामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या मतलबी बडय़ा व्यापाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. आपल्या करचुकवेगिरीच्या संरक्षणासाठी छोटय़ा व्यापाऱ्यांची दिशाभूल करीत सुरू ठेवलेला हा बंद असमर्थनीय, अनाठायी आणि समाज विघातक आहे. जकातीला पर्याय म्हणून लागू केलेला कर अतिरिक्त नाही. त्यामुळे त्याचे कोणतेही नवे ओझे ग्राहकावर नाही आणि व्यापाऱ्यांवरही नाही. या कर आकारणीचा छोटय़ा व्यापाऱ्यांना त्रास होईल असे म्हणणे शुद्ध कांगाव्याचे असल्याचे पक्षाचे राज्य सचिव प्रा. अजित अभ्यंकर आणि जिल्हा सचिव मिलिंद सहस्रबुद्धे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.