सतारवादक सुब्रता डे यांचे मत
सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये शास्त्रीय संगीतातील पारंपरिक घराण्यांची पडझड होत असून काही घराणी लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत, असे मत प्रसिद्ध सतारवादक सुब्रता डे यांनी व्यक्त केले. अशावेळी ही पडझड रोखून विशुद्ध स्वरूपातील शास्त्रीय संगीत जतन करण्याची जबाबदारी युवा कलाकारांवर आहे, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखविली.
अखिल भारतीय सांस्कृतिक संघातर्फे ‘मुड्स ऑफ सतार’ हा सुब्रता डे यांच्या सतारवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डे यांनी आपल्या वादनातून मालकंस रागाची विविध रूपे उलगडली. त्यांना उदय देशपांडे यांनी तबल्याची साथसंगत केली.
संघाच्या अध्यक्षा रत्ना वाघ यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ प्रदान करून डे यांचा गौरव करण्यात आला. संघाचे कार्याध्यक्ष श्याम भुर्के, सचिव हेमंत वाघ, राजसी वाघ, संजय भुजबळ या वेळी उपस्थित होते.
सुब्रता डे म्हणाले, सध्याच्या काळातील वेगवान जीवनशैली, संगीताच्या क्षेत्रातही मोठय़ा प्रमाणावर वाढत असलेला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे अत्यंत समृद्ध असलेली संगीताची पारंपरिक घराणी अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहेत. या घराण्यांच्या संगीत साधकांच्या संख्येत झपाटय़ाने घट होत आहे. मात्र, भारतीय शास्त्रीय संगीताच्या समृद्धीमध्ये या घराण्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कलेचे महत्त्व आजही अबाधित असून ही घराण्याची कला जतन आणि वृद्धिंगत करण्यासाठी प्रस्थापित कलाकारांबरोबरच युवा पिढीच्या कलाकारांनीही पुढे येणे आवश्यक आहे.