नादुरुस्त बस रस्त्यावर न आणण्याबाबत वाहतूक पोलिसांचे पीएमपी प्रशासनाला पत्र

शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली आहे. गर्दीच्या रस्त्यांवर बंद पडणाऱ्या पीएमपी बस वाहतूककोंडीत भर घालत आहेत. दररोज किमान दहा बस गर्दीच्या रस्त्यांवर बंद पडत आहेत. गेल्या सात महिन्यांत शहराच्या वेगवेगळय़ा भागांत १,९४२ पीएमपी बस बंद पडल्या असून, त्या विरोधात वाहतूक पोलिसांनी आवाज उठवला आहे. वाहतूककोंडीला पीएमपी बसही तितक्याच जबाबदार आहेत. नादुरुस्त बस रस्त्यावर आणू नयेत, असे पत्र वाहतूक पोलिसांनी पीएमपीच्या अध्यक्षांना नुकतेच दिले.

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष नयना गुंडे यांना वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस उपायुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी पत्र दिले आहे. बंद पडणाऱ्या पीएमपी बसमुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. पावसाळय़ात पीएमपी बस बंद पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नादुरुस्त बस मार्गावर आणू नयेत, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांत  पीएमपी बस बंद पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बंद पडणाऱ्या बसमुळे कोंडीत भर पडत असून पीएमपी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पत्र देण्यात आले आहे, असे पोलीस उपायुक्त सूर्यवंशी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.

गेल्या सात महिन्यांत १,९४२ बस बंद पडल्या आहेत. किमान दहा बस दररोज बंद (ब्रेक डाऊन) पडतात. विशेष म्हणजे बस गर्दीच्या मार्गावर बंद पडतात. बस बंद पडल्यानंतर वाहतूककोंडी होते. अशा वेळी पोलिसांना वाहतूककोंडी सोडविण्यासाठी रस्त्याच्या एका मार्गिकेचा वापर करावा लागतो. बस बंद पडल्यानंतर पीएमपी प्रशासनाशी संपर्क साधण्यात येतो. नादुरुस्त बस तेथून हलविण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी पीएमपीची क्रेन किंवा ब्रेक डाऊन व्हॅन येते. पोलिसांनी कळविल्यानंतर पीएमपीकडून तातडीने यंत्रणा पाठविण्यात येत नाही, त्यामुळे एक बस बंद पडली तर त्या रस्त्यावरील वाहतूक किमान तास ते दीड तास विस्कळीत होते, असे सूर्यवंशी यांनी सांगितले.

वाहतूककोंडीचे खापर पोलिसांवर कसे?

पुणे शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. लोकसंख्येएवढीच वाहने शहरात आहेत. पावसाळय़ात वाहतूक संथगतीने सुरू असते. पावसामुळे सिग्नल यंत्रणा बंद पडते. अशा वेळी पुणे आणि पिंपरीतील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी फक्त एक हजार वाहतूक पोलीस रस्त्यावर असतात. पुणे शहराचा विस्तार मुंबईपेक्षा जास्त आहे. वाहतूक पोलिसांना उपलब्ध मनुष्यबळात काम करावे लागते. वाहतूककोंडीला एकटय़ा पोलिसांना दोषी ठरविले जाते.‘ स्मार्ट सिटी’ योजनेंतर्गत पदपथ सुशोभीकरणाच्या नावाखाली शहरातील प्रमुख रस्ते अरुंद करण्यात आले आहेत. अतिक्रमणे, अरुंद रस्ते, नियोजनाचा अभाव अशा अनेक समस्या आहेत, अशी  माहिती सूत्रांनी दिली.