रस्ते पुर्रचना धोरणाला आरंभ; १८ कोटी रुपयांचा खर्च

शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यांची पुनर्रचना करताना रस्ते अरुंद होत असल्याची वस्तुस्थिती स्पष्ट झाली असून महापालिकेने स्वीकारलेल्या पुनर्रचना धोरणाला फग्र्युसन रस्त्यावरील कामाने प्रांरभ होणार आहे. त्यामुळे जंगली महाराज रस्त्याबरोबरच आता फग्र्युसन रस्त्यावरही वाहतूक कोंडी होणार असून पुनर्रचनेसाठी या रस्त्यावर १८ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. गरवारे चौक ते कृषी महाविद्यालयपर्यंत हे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे.

शहरातील रस्ते वाहतुकीसाठी मुळातच अरुंद असताना अर्बन स्ट्रीट डिझाइनच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शहराच्या काही प्रमुख रस्त्यांची पुनर्रचना करण्यात येणार आहेत. त्यात लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्त्यासह टिळक रस्ता आणि बाजीराव रस्ता, फग्र्युसन रस्त्यासह एकूण १० रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. जंगली महाराज रस्त्याची पुनर्रचना सुरू केल्यानंतर पुनर्रचनेमुळे वाहतूक कोंडी होत असून वाहनचालकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हा अनुभव वाहनचालक आणि पादचारीही घेत आहेत. त्यात आत फग्र्युसन रस्त्याची भर पडणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी १८ कोटी रुपये खर्च करण्यास महापालिकेच्या पूर्वगणन समितीने (एस्टिमेट कमिटी) मान्यता दिली आहे. त्यामुळे पुनर्रचनेच्या नावाखाली रस्ते अरुंद करण्याच्या धोरणाला फग्र्युसन रस्त्यापासूनच प्रारंभ होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

फग्र्युसन रस्त्याची पुनर्रचना करताना तयार करण्यात आलेला प्रकल्प आराखडा तसेच खर्चाचा तपशील पूर्वगणन समितीपुढे ठेवण्यात आला होता. त्याला या समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. त्याला स्थायी समितीची मान्यता घेण्याची प्रक्रिया पथ विभागाकडून सुरू झाली आहे.

या रस्त्यावर तीन मार्गिका करण्यात येणार आहेत. साडेतीन मीटर रुंदीचे पदपथ दोन्ही बाजूस असतील. पुनर्रचनेत पदपथांबरोबरच सायकल मार्गही प्रस्तावित आहेत. जंगली महाराज रस्त्याप्रमाणेच पादचाऱ्यांसाठी पदपथांवर बैठक व्यवस्थाही नियोजित असून रस्त्याच्या दुतर्फा पार्किंगची सुविधा करण्यात येणार आहे. हा रस्ता २४ मीटर रुंद आहे. मात्र पदपथांची रुंदी वाढविण्यात येणार असल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी अरुंद होणार आहे. जंगली महाराज रस्त्याची पुनर्रचना करताना रस्ता अरुंद होणार नाही, असा दावा प्रशानसाकडून करण्यात आला होता. मात्र तो फोल ठरला. आता फग्र्युसन रस्त्याबाबतही हाच प्रकार होणार आहे. त्यातच रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्किंग प्रस्तावित असल्यामुळे आणि मुळातच वाहनांसाठी हा रस्ता अपुरा ठरत असल्याने या रस्त्यावर वाहतूक कोंडीला सुरुवात होणार आहे.

रस्ते अरुंद होणार

शिवाजी रस्ता (सिमला ऑफिस ते मंडई), शिवाजी रस्ता (मंडई ते स्वारगेट), फग्र्युसन रस्ता, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर, टिळक, केळकर, बाजीराव, बिबवेवाडी येथील स्वामी विवेकानंद रस्ता, सोलापूर रस्ता या रस्त्यांची पुनर्रचना प्रस्तावित आहे. या रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी विविध कामे करण्यात येतील, असा दावा केला जात असला तरी तो फोलच ठरणार आहे. मुळातच हे रस्ते वाहतुकीसाठी अरुंद आहेत. शहरातील खासगी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सकाळी आणि संध्याकाळी या रस्त्यांवरून चालणेही अडचणीचे ठरते. त्यातच हे रस्ते अरुंद होणार आहेत.

धोरण नागरिकांसाठी अडचणीचेच

जंगली महाराज रस्ता सुशोभीकरण आणि पुनर्रचनेच्या नावाखाली खोदण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील प्रमुख रस्ता असताना या रस्त्याची मोडतोड करण्यात आल्यामुळे त्याबाबत तीव्र नाराजीही व्यक्त करण्यात येत आहे. जंगली महाराज रस्त्यावरील पदपथ मोठे केले असले, तरी त्यावर अतिक्रमणे वाढली आहेत. तसेच सायकल मार्गाचा वापरही चुकीच्या पद्धतीने होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सुशोभीकरणाचे आणि पुनर्रचनेचे महापालिकेचे धोरण पुणेकरांसाठी अडचणीचे ठरणार आहे.