मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक प्रमुख चौकांमधील वाहतूक नियंत्रण करणारे दिवे बंद पडल्यामुळे वाहतूकीची कोंडी झाली. विशेषत: डेक्कन भागातील जंगली महाराज रस्त्यांवर मोठी कोंेडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मुसळधार पावसामुळे वाहतूकीचा वेग मंदावला होता. गणेशिखड रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, नेहरु रस्ता, शंकरशेठ रस्ता, सिंहगड रस्त्यासह  शहरातील प्रमुख रस्त्यांवर कोंडी झाली होती. शहराच्या मध्यभागातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. साचलेल्या पाण्यातून वाट काढणाऱ्या वाहनांचा वेग कमी झाल्याने काही भागात कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे बाबा भिडे पुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे डेक्कन भागात सायंकाळी वाहतूकीची मोठी कोंडी झाली होती. आपटे रस्ता, घोले रस्ता या रस्त्यांवर कोंडी झाली होती. जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकातील वाहतूक नियंत्रण दिवे बंद पडल्याने वाहतूक संथगतीने सुरु होती.

३० ठिकाणी झाडे पडली

शहरात  सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या भागात ३० ते ३५ ठिकाणी झाडे पडली. बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास टिळक रस्त्यावरील पूरम चौकानजीक झाड पडल्याने पादचारी स्वाती धुमाळ जखमी झाल्या. झाड पडल्यामुळे पूरम चौक ते टिळक रस्त्यादरम्यानची वाहतूक विस्कळीत झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी तेथे धाव घेऊन पडलेल्या झाडाच्या फांद्या बाजूला केल्या.