पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग व मुंबई-पुणे महामार्गावर शनिवारी झालेल्या वाहतूक कोंडीचा धसका घेतल्याने रविवारी दोन्ही रस्त्यांवर वाहनांची संख्या काहीशी घटली असली, तरी वाहतूक कोंडीतून रविवारीही नागरिकांची सुटका झाली नाही. शनिवारी या दोन्ही रस्त्यांवर नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ धोकादायक दरडी काढण्याचे काम सुरू असल्याने द्रुतगती मार्गावरील वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळविण्यात आली आहे. त्यामुळे शनिवारी जुन्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना अनेक तास वाहनातच अडकून रहावे लागले. या अनुभवानंतर रविवारी दोन्ही रस्त्यावरील वाहने किंचितशी कमी झाली. मात्र, प्रवास गरजेचा असणाऱ्या अनेकांची वाहने रस्त्यावर असल्याने, त्याचप्रमाणे जड वाहनेही मोठय़ा प्रमाणावर रस्त्यावर असल्याने वाहतूक कोंडीचा अनुभव रविवारीही आला. कोंडीमध्ये वाहने बंद पडत असल्याने कोंडीत भरच पडत होती.
दरम्यान, आडोशी बोगद्याजवळ धोकादायक दरडी काढण्याचे काम रविवारीही सुरू होते. या ठिकाणाचे काम पूर्ण झाल्यानंतर खंडाळा येथील धोकादायक दरडी काढण्यास सुरूवात करण्यात येणार आहे. त्यामुळे द्रुतगती मार्गावरील वाहतूक जुन्या मार्गावरून वळविण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.