पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाटात अडकलेला ट्रक बाजूला काढण्यासाठी दुपारी काही वेळ वाहतूक वळविण्यात आली असतानाच रविवारमुळे मोठय़ा प्रमाणावर वाहने मार्गावर आल्याने द्रुतगती मार्गाबरोबरच पुणे- मुंबई महामार्गावरील वाहतुकीचा बोजवारा उडाला. दुपारी तीन वाजल्यापासून दोन्ही रस्त्यांवर पाच तासांहून अधिक काळ वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे अनेक वाहने या कोंडीत अडकली. रात्री उशिरापर्यंत वाहतूक संथ गतीनेच सुरू होती.
महामार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपासून बोरघाटात एक ट्रक अडकलेला होता. तो काढण्यासाठी पोलिसांनी काही वेळ वाहतूक पुणे- मुंबई महामार्गावर वळविली होती. रविवार असल्याने दोन्ही रस्त्यांवर नेहमीपेक्षा वाहनांची संख्या जास्त होती. मुंबईहून लोणावळा भागात आलेल्या पर्यटकांची वाहनेही मोठय़ा प्रमाणावर रस्त्यावर होती. वळविलेली वाहतूक व वाहनांची अतिरिक्त संख्या याचा परिणाम म्हणून दुपारी काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यानंतर काही वेळाने हळूहळू वाहने पुढे सरकू लागली. मात्र वाहनांची कोंडी कमी होऊ शकली नाही. संध्याकाळपर्यंत दोन्ही रस्त्यांवर लोणावळा परिसरामध्ये हीच स्थिती होती. वाहतूक कोंडीत अनेकजण अडकून पडल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. रात्री उशिरापर्यंत दोन्ही रस्त्यावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती.