वाहतूक पोलिसांची स्पष्ट भूमिका, महापालिके ला पत्र

पुणे : संगमवाडी बीआरटी (बस रॅपिड ट्रॅन्झिट- बीआरटी) मार्ग अव्यवहार्य असून या मार्गामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने महापालिकेने संगमवाडी-येरवडा बीआरटी मार्ग पूर्णपणे उखडून टाकावा, अशी स्पष्ट भूमिका येरवडा वाहतूक पोलिसांनी घेतली आहे. त्याबाबतचे पत्र पोलिसांनी महापालिके च्या पथ विभागाला दिले आहे. या पत्रामुळे २०० कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या बीआरटी मार्गाचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

खासगी वाहनांची वाढती संख्या, प्रदूषण आणि वाहतूक कोंडी टाळण्याबरोबरच सार्वजनिक वाहतुकीचे सक्षमीकरण करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला शाश्वत पर्याय म्हणून संगमवाडी बीआरटी मार्गाची उभारणी करण्यात आली. मात्र पोलिसांच्या दृष्टीने हा मार्ग अपघातांचे ठिकाण झाला आहे. बीआरटी मार्गात वळण असल्यामुळे येथे सातत्याने अपघात होत आहेत. बीआरटी मार्गाने रस्त्याची ६० टक्के  जागा व्यापली आहे. उर्वरित रस्त्यावरून खासगी वाहने, पीएमपीच्या अन्य गाडय़ा धावत आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी होत आहे. बीआरटी मार्गासाठी बॅरिकेड लावण्यात आल्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. हा भाग रहिवासी क्षेत्र नसतानाही मार्गालगतचे पदपथ प्रशस्त करण्यात आले आहेत. अशी कारणे पुढे करीत बीआरटी मार्ग नको, अशी भूमिका वाहतूक पोलिसांनी घेतली आहे. सध्या टाळेबंदीमुळे रस्त्यावरील वाहतूक कमी आहे. त्यामुळे दिवाळी पूर्वीच मार्ग काढून टाकावा, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. २०१४ मध्ये संगमवाडी बीआरटी मार्गाची उभारणी करण्यात आली. त्यासाठी २०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. या मार्गामुळे  प्रवाशांना जलदगती सेवा मिळेल, असा दावा करण्यात आला होता. प्रत्यक्षात हा मार्ग पहिल्यापासूनच वादात सापडला असल्याची वस्तुस्थिती आहे. अपूर्ण कामे, बीआरटी मार्गात होत असलेली खासगी वाहनांची घुसखोरी, पायाभूत सुविधांच्या नावाखाली तसेच पुनर्रचनेसाठी करण्यात आलेली कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी आणि मार्गालगत झालेली अतिक्रमणे यामुळे संगमवाडी बीआरटी मार्ग वादग्रस्त ठरला होता. बीआरटी मार्ग विकसित करताना वाहतुकीचा अभ्यास करण्यात आला नाही, असा आक्षेप घेत काही स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी या मार्गाला विरोध दर्शविला होता. आता पोलिसांनीही संगमवाडी ते येरवडा हा बीआरटी मार्ग अव्यवहार्य असल्याचे सांगत त्याला विरोध के ल्यामुळे बीआरटी मार्गाची रडकथा ही कायम राहिली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पत्रात काय?

संगमवाडी-विश्रांतवाडी असा मार्ग असून तो ८ किलोमीटर लांबीचा आहे. त्या अंतर्गत संगमवाडी ते येरवडा हा टप्पा अपघातप्रवण क्षेत्र आहे. बीआरटीच्या गाडय़ा, खासगी चारचाकी, तीन चाकी वाहनांमुळे या भागात सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. प्रशस्त पदपथही वाहतूक कोंडीत भर घालत आहेत.

बीआरटी मार्गामुळे वाहतूक कोंडी होत असल्यामुळे बीआरटी मार्ग काढून टाका, असे पत्र पोलिसांकडून महापालिके ला मिळाले आहे. मात्र मार्ग काढून टाकणे हा त्यावरील उपाय नाही. वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने त्या संदर्भात चर्चा करून योग्य ती कार्यवाही के ली जाईल.

– व्ही. जी. कु लकर्णी, पथ विभाग प्रमुख